pm narendra modi slams congress and opposition parties in bjp national executive council meeting | तुम्हाला तुमचे पैसे चोरून स्वतःच्या घरात वाटणारा पंतप्रधान हवाय का?; मोदींचा टोला
तुम्हाला तुमचे पैसे चोरून स्वतःच्या घरात वाटणारा पंतप्रधान हवाय का?; मोदींचा टोला

नवी दिल्ली: तुम्हाला कसा प्रधानसेवक हवा आहे? तुमचे पैसे चोरून स्वत:च्या घरात वाटणारा सेवक तुम्हाला हवा आहे का? असे प्रश्न विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधकांना केंद्रात कमकुवत सरकार हवं आहे. त्यांना केवळ स्वत:ची दुकानं चालवण्यात रस आहे. त्यासाठीच त्यांना केंद्रात दुबळं सरकार हवं आहे, अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीला लक्ष्य केलं. ते भाजपाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. या कार्यक्रमाला अनेक केंद्रीय मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित होते. 

आपण अतिशय कठोर परिस्थितीतून इथंवर पोहोचलो आहोत. आपण पक्षाला मजबूत केलं आहे. आपल्यावर संघटनेचं संस्कार नसते, तर दुसऱ्यांच्या मधाळ बोलण्यात आपण नक्की फसलो असतो. पक्षाच्या परंपरेमुळे, शिस्तीमुळे, लाखो कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि त्यागामुळे आज आपण इथे आहोत, असं मोदी म्हणाले. तुम्हाला नेमका कसा प्रधानसेवक हवा, असा सवाल त्यांनी विचारला. 'तुमचे पैसे चोरून स्वत:च्या घरात वाटणारा सेवक तुम्हाला हवा आहे का? तुमच्या घरातल्या गोष्टी शेजाऱ्यांच्या घरात जाऊन सांगणारा प्रधान सेवक तुम्हाला चालेल का?', असे प्रश्न मोदींनी उपस्थित केले. 

पंतप्रधानांनी विरोधकांच्या महाआघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. 'जे पक्ष कधीकाळी काँग्रेसच्या विरोधात होते, ज्यांची विचारधाराच काँग्रेसविरोधी होती, ते पक्ष आज एकत्र येत आहेत. तेलंगणात त्यांचा पराभव झाला. कर्नाटकमध्ये त्यांनी सरकार स्थापन केलं. तिथले मुख्यमंत्री म्हणतात, मी तर आता क्लर्क झालो आहे. विरोधकांचं हे चित्र हा तर निव्वळ ट्रेलर आहे. लवकरच यांचा पिक्चरदेखील दिसेल. हे सर्वकाही फक्त एका व्यक्तीविरोधात सुरू आहे,' असं मोदी म्हणाले. केंद्रात कमकुवत सरकार यावं. त्यामुळे घोटाळे करायला मिळावे आणि त्यातून स्वत:चं दुकानं चालावं, हीच या मंडळीची इच्छा आहे, अशा शब्दांमध्ये मोदींनी महाआघाडीला लक्ष्य केलं. 
 


Web Title: pm narendra modi slams congress and opposition parties in bjp national executive council meeting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.