मुलं अधिक जबाबदारीनं वागली, तरच मुलींना सुरक्षित वाटेल- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 08:15 PM2018-04-24T20:15:15+5:302018-04-24T20:15:15+5:30

कथुआ, उन्नव बलात्कार प्रकरणावर मोदींचं भाष्य

pm modi asked to make sons more responsible to stop rapes | मुलं अधिक जबाबदारीनं वागली, तरच मुलींना सुरक्षित वाटेल- मोदी

मुलं अधिक जबाबदारीनं वागली, तरच मुलींना सुरक्षित वाटेल- मोदी

Next

मध्य प्रदेश: कथुआ आणि उन्नव बलात्कार प्रकरणानंतर केंद्र सरकारनं अध्यादेश आणून 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी मुलांनी अधिक जबाबदारीनं वागण्याची गरज व्यक्त केली. 'लोकांनी त्यांच्या मुलींना सन्मान द्यायला हवा आणि मुलींना सुरक्षित वातावरण पुरवण्यासाठी मुलांना त्यांच्यावर असणाऱ्या जबाबदारीची जाणीव करुन द्यायला हवी,' असं मोदींनी मध्यप्रदेशातील मांडला येथे बोलताना म्हटलं. महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी सामाजिक आंदोलन छेडण्याचं आवाहनही त्यांनी केलं. 

मांडला येथे आयोजित रॅलीत पंतप्रधान मोदींआधी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं भाषण झालं. त्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारनं शनिवारी घेतलेल्या निर्णयाचा उल्लेख केला. 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला थेट फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय शनिवारी मोदींच्या मंत्रिमंडळानं घेतला. याबद्दल बोलताना, दिल्लीतील सरकार जनभावना लक्षात घेऊनच निर्णय घेत असल्याचं मोदींनी म्हटलं. लोकांच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचंही मोदी म्हणाले. 

कथुआ आणि उन्नव प्रकरणानंतर भाजपवर टीकेची झोड उठली होती. उन्नवमधील बलात्कार प्रकरणात भाजपच्या आमदाराला अटक झाली आहे. तर कथुआमधील बलात्कार प्रकरणातील आरोपीसाठी भाजपचे आमदार रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे जनभावना अतिशय तीव्र झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेत पॉक्सो कायद्यात बदल केला. याआधी अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जात होती. त्यात मोदी सरकारनं बदल करत अशा प्रकारचं संतापजनक कृत्य करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. 
 

Web Title: pm modi asked to make sons more responsible to stop rapes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.