आज मोदी अयोध्येला जाणार; पण मंदिरांपासून दूर राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 07:57 AM2019-05-01T07:57:47+5:302019-05-01T08:03:56+5:30

मोदींच्या भूमिकेमुळे अयोध्येत अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

Pm Modi To Address Rally In Ayodhya Today Likely To skip visit to Ram Temple | आज मोदी अयोध्येला जाणार; पण मंदिरांपासून दूर राहणार

आज मोदी अयोध्येला जाणार; पण मंदिरांपासून दूर राहणार

Next

अयोध्या: नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच अयोध्येचा दौरा करणार आहेत. मात्र ते हनुमानगढी मंदिर, राम मंदिराला भेट देणार नाहीत. मोदी धार्मिक स्थळांपासून दूर राहणार असल्यानं स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. अयोध्येपासून मोदी लांब का राहत आहेत, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हनुमानगढी मंदिरात येऊन दर्शन करुन गेले. मग मोदी अयोध्येपासून दूर का राहत आहेत, अशी चर्चा जिल्ह्यात आहे. तर राम मंदिर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्यानं त्याचा निकाल आल्यावरच मोदी अयोध्येतल्या राम मंदिराला भेट देतील, अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे. 

पंतप्रधान मोदींनी राम मंदिरासाठी भूमिपूजन करावं अशी इच्छा निर्वाणी आखाडा आणि राम जन्मभूमी प्रकरणातले प्रमुख पक्षकार धरमदास यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. यासाठी मोदींना विनंती करा, असं मी आधीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुचवलं असल्याचंदेखील ते म्हणाले. तर मोदींनी अयोध्येला नक्की यावं अशी भावना फैजाबादमधल्या नाका हनुमानगढीच्या महंत रामदास यांनी व्यक्त केली. मोदींच्या अयोध्या भेटीमुळे सर्वसामान्यांना एक ठोस आश्वासन मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. 

मोदी आज रामपूरमध्ये जनसभेला संबोधित करणार आहेत. अयोध्या-आंबेडकर जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं रामपूर वादग्रस्त राम जन्मभूमीपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर आहे. फैजाबाद आणि आंबेडकर नगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी आज जनसभा घेणार आहेत. मोदींच्या आधी राहुल गांधी, प्रियंका गांधी या भागात येऊन गेले आहेत. राहुल यांनी 2017 मध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान हनुमानगढी मंदिराला भेट दिली होती. तर प्रियंका गेल्याच महिन्यात मंदिरात येऊन गेल्या. मात्र या दोन्ही नेत्यांनी वादग्रस्त स्थळापासून दूर राहणं पसंत केलं. 
 

Web Title: Pm Modi To Address Rally In Ayodhya Today Likely To skip visit to Ram Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.