नवी दिल्ली : भल्यामोठ्या कढईतील आठशे किलो खिचडीवर तडतडणा-या साजूक तुपात जिरे-मोहरी-हिंगाची फोडणी देत योग गुरू बाबा रामदेव व देशभरातील ५0 नामवंत शेफनी शनिवारी इंडिया गेटवर जागतिक विक्रम रचला. हजारो लोकांचा जल्लोष व फोडणीचा ठसका आणि खमंग मसाल्याचा वास यामुळे राजधानीतील इंडिया गेटचा परिसर भरून गेला होता.

राजपथाची झाली खाऊगल्ली
पन्नास शेफनी जागतिक खाद्यान्न महोत्सवात ही खिचडी शिजवली. शिखांच्या गुरू पर्वाचे निमित्त साधून ही खिचडी गुरूद्वारा व स्वयंसेवी संस्थांमध्ये वाटली. या वेळी अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरसीमरत कौर बादल व राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती उपस्थित होत्या.

राजकारणाचे केंद्र असलेला राजपथ या खिचडीमुळे आज
जणू काही खाऊगल्ली झाला होता. इंडिया गेट सर्कलवर चहुबाजूंनी लोक या खाद्यान्न महोत्सवात सहभागी होत होते. सकाळपासूनच कार्यक्रमस्थळी गर्दी जमली होती.

विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होते. अन्नप्रक्रिया क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी भारताने पुढाकार घेत महोत्सवाचे यजमानपद घेतले आहे.