पुलवामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; निमलष्करी दलाला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 04:41 PM2019-02-21T16:41:32+5:302019-02-21T16:43:58+5:30

निमलष्करी दलाला आता हवाई मार्गानं ये-जा करता येणार

Personnel Of Central Armed Paramilitary Forces Will Entitled To Air Travel To And From Srinagar | पुलवामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; निमलष्करी दलाला मोठा दिलासा

पुलवामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; निमलष्करी दलाला मोठा दिलासा

googlenewsNext

नवी दिल्ली: पुलवामासारख्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मोदी सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. श्रीनगरहून येण्या-जाण्यासाठी निमलष्करी दलाचे जवान आता हवाई मार्गाचा वापर करु शकतात. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली, जम्मू-श्रीनगर आणि श्रीनगर-जम्मू या दरम्यान निमलष्करी दलाचे जवान हवाई मार्गानं प्रवास करु शकतात. केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाच्या जवानांसाठीही हा आदेश लागू असेल.




गृह मंत्रालयाच्या आदेशाचा फायदा निमलष्करी दलाच्या 7 लाख 80 हजार जनानांना होईल. यामध्ये कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, एएसआईपासून सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. निमलष्करी दलाच्या जवानांना हवाई मार्गानं प्रवास करता येत नव्हता. पुलवामात ज्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला, त्यात सीआरपीएफचे तब्बल अडीच हजार जवान होते. इतके जवान एकाचवेळी का प्रवास करत होते, असा प्रश्न या हल्ल्यानंतर उपस्थित झाला. या जवानांना हवाई मार्गानं श्रीनगरला पाठवण्यात आलं असतं, तर हल्ला टाळता आला असता, अशी चर्चादेखील त्यावेळी झाली. त्यामुळे आता सरकारनं निमलष्करी दलाच्या जवानांना हवाई मार्गानं प्रवास करण्याचे अधिकार दिले आहेत. 




आठवड्याभरापूर्वी पुलवामात सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. स्फोटकांनी भरलेल्या गाडीनं ताफ्यातील एका बसला जोरदार धडक दिल्यानं मोठी दुर्घटना घडली. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. अडीच हजार जवानांचा ताफा श्रीनगरला जात होता. इतक्या मोठ्या संख्येनं जवान रस्त्यानं प्रवास करणार असल्यानं सुरक्षेचा मुद्दा होता. त्यामुळे त्यांना हवाई मार्गानं नेण्याची परवानगी मागण्यात आली होती. मात्र गृह मंत्रालयानं ती दिली नाही, असं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. मात्र हे वृत्त निराधार असल्याचं स्पष्टीकरण गृह मंत्रालयानं दिलं होतं. 

Web Title: Personnel Of Central Armed Paramilitary Forces Will Entitled To Air Travel To And From Srinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.