नवी दिल्ली - सत्ताधारी भाजपाविरुद्ध वारे वाहत असल्याने गुजरातच्या विधानसभा निवडुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यातच राहुल गांधी यांच्या झंझावाती प्रचारसभा आणि हार्दिक पटेलसह इतर नेत्यांचा काँग्रेसला मिळत असलेला पाठिंबा यामुळे ही निवडणूक भजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अवघड जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र आज प्रसिद्ध झालेल्या आज तक-इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या ओपिनियन पोलमधून गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपा सरकारच सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
आज प्रसिद्ध झालेल्या या पोलमध्ये 182 सदस्य असलेल्या गुजरातच्या विधानसभेमध्ये भाजपाला 115 ते 125 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला केवळ 57 ते 65 जागा मिळतील, असे या सर्वेत नमूद करण्यात आले आहे. 
 गेल्या 22 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाला गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर विरोधाचा  सामना करावा लागत आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचा भरणा असलेल्या गुजराती समाजामध्ये भाजपाबाबत मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसत आहे. त्यामुळे भाजपाला यावेळची विधानसभा निवडणूक कठीण जाणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 
 हार्दिक पटेल निष्प्रभ 
या ओपिनियन पोलनुसार गुजरामध्ये मोठ्या प्रमाणावर गाजावाजा झालेल्या हार्दिक पटेलचा प्रभाव पडणार नाही. पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल भाजपाला नुकसान करू शकत नाही. तसेच हार्दिक पटेल आणि काँग्रेस एकत्र आल्यास त्यामधूनही काँग्रेसला फारसा लाभ होणार नाही. हार्दिक पटेल काँग्रेससोबत असल्यात काँग्रेसच्या जागा किरकोळ प्रमाणात वाढून त्यांना 62 ते 71 पर्यंत पोहोचतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  
मुख्यमंत्री म्हणून रुपानी यांना पसंती
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पोलमध्ये विजय रुपानी यांना पसंत देण्यात आली आहे. रुपानी यांना 34 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. तर काँग्रेसच्या शक्ति सिंह गोहिल यांना 19 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे.