पंढरपूर वारी 2019 : पंतप्रधान मोदी, बिग बींकडून मराठीतून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 11:35 AM2019-07-12T11:35:30+5:302019-07-12T15:41:29+5:30

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देशवासियांना आषाढी एकादशीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Pandharpur Wari 2019 ashadhi ekadashi narendra modi and amitabh bachchan | पंढरपूर वारी 2019 : पंतप्रधान मोदी, बिग बींकडून मराठीतून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

पंढरपूर वारी 2019 : पंतप्रधान मोदी, बिग बींकडून मराठीतून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

googlenewsNext
ठळक मुद्देदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देशवासियांना आषाढी एकादशीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी व बिग बींनी मराठी भाषेत ट्वीट केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लातूरचे वारकरी शेतकरी दांपत्याच्या हस्ते आज विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे पार पडली.

नवी दिल्ली -  शेकडो किमींचा पायी प्रवास करून गेलेल्या वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या पहाटे विठूनामाचा गजर सुरू केला आहे. आषाढी एकादशीच्या महासोहळ्यासाठी पंढरीत जवळपास लाखो भाविक दाखल झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देशवासियांना आषाढी एकादशीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी व बिग बींनी मराठी भाषेत ट्वीट केलं आहे. 

'आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना मन:पूर्वक शुभेच्छा! विठुराया आणि रखुमाईच्या कृपेने सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे, ही माझी विनम्र प्रार्थना' असं ट्वीट करून पंतप्रधान मोदी यांनी देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देशातील नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे. यासोबतच पंतप्रधानांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. 


पंढरीच्या विठुरायाच्या भेटीसाठी गेल्या काही दिवसांपासून पायी वाटचाल करणाऱ्या विविध संतसज्जनांच्या पालख्या चंद्रभागातीरी दाखल झाल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी देखील मराठी भाषेत ट्वीट करून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा विणा || माऊली निघाले पंढरपूरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला || ||जय जय राम कृष्ण हरी|| आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा' असं ट्वीट बिग बींनी केलं आहे. 




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लातूरचे वारकरी शेतकरी दांपत्याच्या हस्ते आज विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे पार पडली. विठ्ठलाची पूजा केल्यानंतर अनेकांनी मुख्यमंत्र्यांना विचारले की काय मागणे मागितले त्यावर मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे काय मागणार, तो मनातील जाणतो. तरीही मनातील हूरहूर विठ्ठलाकडे मांडली. माझा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, दुष्काळाच्या फेऱ्यात शेतकरी अडकलाय तो सुखी व्हावा, असे साकडे घातल्याचे सांगितले आहे. विठ्ठलाची महापूजा पार पडल्यानंतर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. पंढरपूरची वारी निर्मळ व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले. आज अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक वारी सुरू आहे. भीमा-चंद्रभागेच्या स्वच्छतेचा प्रकल्प सुरू केला आहे. काम मोठे आहे, पण पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. 

पुजेचा मान कसा मिळतो? 

पंढरपूरला लाखो वारकरी आलेले असतात. यापैकी एका दांम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पूजा करण्याचा मान मिळतो. पण एवढ्या लाखो वैष्णवांमधून या दांपत्याची निवड कशी केली जाते? विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी हे वारकरी तासंतास रांग लावतात. या रांगेमध्ये पहिला उभा असलेल्या दांम्पत्याला महापुजेचा मान दिला जातो. जर विठ्ठलाचे दर्शन झाले नाही तर वारकरी निराश होत नाहीत. तर ते शेजारच्या कृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतात आणि तृप्त होतात. 


आषाढी एकादशीच्या पहाटे विठ्ठलाची पूजा करण्याचा मान यंदा सलग चार दशके वारी करणाऱ्या लातूरच्या शेतकऱ्याला मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत पांडुरंगाची पूजा करण्याचा मान मिळाल्यामुळे आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. या शेतकऱ्याचे नाव विठ्ठल मारुती चव्हाण असून ते 61 वर्षांचे आहेत. त्यांचे मूळ गाव सांगवी, सुनेगाव तांडा आहे. विठ्ठल चव्हाण हे दहा वर्षे उपसरपंच होते. तसेच सध्या तंटामुक्त समितीचे सदस्य आहेत. चव्हाण हे 1980 पासून पंढरपूरची वारी करत आहेत. विठ्ठल चव्हाण यांनी सांगितले की, गावाकडे पाच एकर शेती आहे. बागायत शेती होती. मात्र, दुष्काळामुळे कोणतीही पिके पिकत नाहीत. महाराष्ट्रातला दुष्काळ नाहीसा व्हावा, भरपूर पाऊस पडावा, हीच मागणी विठ्ठल चरणी करणार आहे. नापिकीमुळे दोन्ही मुले चालक म्हणून नोकरी करतात.


Web Title: Pandharpur Wari 2019 ashadhi ekadashi narendra modi and amitabh bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.