चंदिगड -  गेल्या आठवड्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या आणि राम रहिमला अटक करण्यात आल्यानंतर सध्या चौकशी सुरू असलेल्या हनीप्रीत इन्सा हिची पंचकुला जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर हनीप्रीत हिला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने हनिप्रीत आणि तिची साथीदार सुखदीप कोर हिला 23 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. 
हिंसाचार प्रकरणी आरोप झाल्यानंतर सुमारे महिनाभर पोलिसांना हुलकावणी दिल्यानंतर हनिप्रीत हिने गेल्या आठवड्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. तेव्हापासून बाबा राम रहिम आणि बाबाला अटक झाल्यानंतर हरयाणामध्ये उफाळलेल्या हिंसाचाराप्रकरणी तिची कसून चौकशी सुरू होती.  
मागच्या महिन्याभरापासून फरार असलेल्या हनीप्रीत इन्साने अखेर ३ ऑक्टोबर रोजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. ती हरयाणा पोलिसांच्या ताब्यात आहे. हनीप्रीत बाबा गुरमीत राम रहीमची दत्तक मुलगी आहे. राम रहीम साध्वींवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. हनीप्रीतने आत्मसमर्पण करण्याआधी माध्यमांना मुलाखती दिल्या. त्यात तिने आपली बाजू मांडली. 
राम रहीम आणि ती पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा तिने केला. वडिलांबरोबर आपल नातं पवित्र असल्याचं हनीप्रीतने या मुलाखतीत सांगितलं. हनीप्रीतचा पूर्वपती विश्वास गुप्ताने हनीप्रीतचे राम रहीमबरोबर अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. मी राम रहीम आणि हनीप्रीतला एकत्र नेकेड,  सेक्स करताना बघितले होते असे विश्वास गुप्ताने पत्रकार परीषदेत सांगितले होते. 
25 ऑगस्टला पंचकुला न्यायालयाने राम रहीमला साध्वींवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. त्यानंतर हरयाणा, पंजाब आणि दिल्लीमध्ये जोरदार हिंसाचार झाला. या सर्व घडामोडींनंतर हनीप्रीत गायब झाली. तिच्यासह डे-यातील काही सदस्यांवर हिंसाचारासाठी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. मागच्या आठवडयात दिल्ली उच्च न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळून लावला. हनीप्रीत नेपाळला पळून गेल्याचीही चर्चा होती.