Pakistan violates ceasefire, a jawan martyr | पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद

जम्मू-काश्मीर : जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. येथील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमधील सीमरेषेजवळ जवान तैनात होते. यावेळी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. दरम्यान, भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी पाकधार्जिण्या अतिरेकी कारवायांनी विदीर्ण झालेल्या काश्मीरच्या सरत्या वर्षाची सांगता  रक्तपाताने झाली. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 5 जवान शहीद झाले, तर आणखी तिघे जखमी झाले. नंतर सुरक्षा दलांनी कित्येक तास केलेल्या जबाबी कारवाईत हल्ला करणारे दोन अतिरेकी ठार झाले.
गेल्या वर्षी उरी येथे झालेल्या हल्ल्याची आठवण ताजी व्हावी, असा हा आत्मघाती हल्ला रविवारी पहाटे 2च्या सुमारास झाला. ‘सीअरपीएफ’ आणि पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधीपासून आसपासच्या झुडपांमध्ये लपून बसलेले शस्त्रसज्ज अतिरेकी या तळात घुसले. प्रवेशद्वारावर पहारा देणा-या सशस्त्र जवानाने त्यांना हटकले, परंतु रॉकेट लॉन्चर व मशिनगन घेऊन आलेल्या या अतिरेक्यांनी हातबॉम्ब फेकत आत प्रवेश मिळविला.

भरती होणा-यांपेक्षा ठार होणा-या दहशतवाद्यांची संख्या जास्त
जम्मू काश्मीरमध्ये गुप्तचर यंत्रणांकडून मिळत असलेल्या ठोस माहितीच्या आधारे दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत दहशतवादाचे कंबरडे मोडण्यात यश मिळाले आहे. परिस्थिती तर अशी झाली आहे की, या वर्षात जितके दहशतवादी भरती झालेले नाहीत त्यापेक्षा जास्त दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जम्मू काश्मीरात एकूण 71 दहशतवाद्यांची भरती करण्यात आली होती. मात्र लष्कराने कारवाई करत एकूण 132 दहशतवाद्यांना ठार केले आहे.