विरोधकांकडून लोकसभेत कर्नाटक मॉडेलची पुनरावृत्ती? मोदींना रोखण्यासाठी नवी रणनीती  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 04:49 PM2019-05-18T16:49:16+5:302019-05-18T16:50:10+5:30

 लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, 23 मे रोजी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Opposition repeats Karnataka model in Lok Sabha? New strategy to stop Modi | विरोधकांकडून लोकसभेत कर्नाटक मॉडेलची पुनरावृत्ती? मोदींना रोखण्यासाठी नवी रणनीती  

विरोधकांकडून लोकसभेत कर्नाटक मॉडेलची पुनरावृत्ती? मोदींना रोखण्यासाठी नवी रणनीती  

Next

नवी दिल्ली -  लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, 23 मे रोजी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपाचे बहुमत हुकल्यास मोदींना सत्ता हस्तगत करता येऊ नये, यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेत विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा एक भाग म्हणून चंद्राबाबू नायडू यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आता चंद्राबाबू नायडू हे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बसपाच्या प्रमुख मायावती यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

लोकसभेत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला तरी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून कर्नाटकप्रमाणे सरकार स्थापन करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी सुरू केलेल्या मोर्चेबांधणीमुळे तिसऱ्या मोर्चाच्या स्थापनेची शक्यता वाढली आहे. दरम्यान, भाजपाला सत्तेतून रोखण्यासाठी आम्ही प्रसंगी पंतप्रधानपदावरील दावेदारीही सोडू, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले होते. नंतर त्यांनी आपल्या विधानापासून धुमजाव केले होते. मात्र भाजपाला बहुमत न मिळण्याच्या परिस्थितीत काँग्रेस विरोधी पक्षातील कुठल्याही नेत्याला पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याची शक्यता आहे. 

 दरम्यान, कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार चालवत असलेल्या जेडीएसने काँग्रेससोबत मतभेद असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. जेडीएसचे नेते एच.डी. देवेगौडा यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. कर्नाटकमध्ये स्वत:चे सरकार बनत नसल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेसने थेट जेडीएसला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर काही दिवस चाललेल्या राजकीय उलथापालथीनंतर जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. 

 दुसरीकडे बसपाप्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. उत्तर प्रदेशातील महाआघाडीमधील हे नेते 23 मे रोजी निकाल स्पष्ट झाल्यावरच आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.  

Web Title: Opposition repeats Karnataka model in Lok Sabha? New strategy to stop Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.