ठळक मुद्देभाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी 2005 साली पाकिस्तान दौ-यावर गेले होते. आडवाणींनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांच्या कराचीमधील कबरीला भेट दिली होती.

नवी दिल्ली, दि. 13 - गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर असताना ज्या मोदींनी डोक्यावर मुस्लिम टोपी घालायला नकार दिला होता. तेच मोदी आज जपानच्या पंतप्रधानांसह गुजरातच्या मशिदीमध्ये जाणार आहेत. मोदी मशिदीमध्ये जाणार असल्याने सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरु असून वेगवेगळया प्रतिक्रिया उमटत आहेत. 

2005 साली लालकृष्ण आडवाणींना जो निकष लावला तोच मोदींनाही लावणार का ? हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी 2005 साली पाकिस्तान दौ-यावर गेले होते. त्यावेळी आडवाणींनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांच्या कराचीमधील कबरीला भेट दिली होती. आडवणींनी त्यावेळी जीनाचे तोंडभरून कौतुक केले होते. जीना धर्मनिरपेक्ष नेते असल्याचे आडवाणी म्हणाले होते. 

कदाचित आडवाणींना त्यावेळी आपण केलेल्या विधानाचे भारतात काय पडसाद उमटतील याची कल्पना नसावी. आडवाणींच्या या विधानानंतर भारतात मोठा गहजब झाला होता. भाजपाची पितृ संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह परिवारातील सर्वच संघटना आडवाणींवर नाराज झाल्या होत्या. काहींनी त्यांना विश्वासघातकी म्हटले होते. त्यावेळी दबाव इतका वाढला होता की, आडवाणींना भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण त्यांच्याकडून लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद मात्र काढून घेतले नव्हते. 2004 ते 2009 आडवाणी लोकसभेचे विरोधीपक्षनेते होते. 

2009 साली भाजपाने आडवाणी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने लोकसभेची निवडणूक लढवली पण भाजपाचा पराभव झाला. 2014 लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांचा विरोध डावलून नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्यात आले. मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर आडवाणी बाजूला पडले. आज ते मुख्य राजकारणापासून दूर आहेत. 

भारत आणि जपानचे पंतप्रधान ज्या सिदी सय्यद मशिदीला भेट देणार आहेत त्याविषयी जाणून घेऊया. 
- मोदी आणि अबे येणार असल्याने या मशिदीची सुंदर सजावट करण्यात आली आहे. 

- 16 व्या शतकात बांधण्यात आलेली ही मशीद जाळीदार नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे. 

- सिदी सय्यद मशीद अहमदाबादमधील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक समजली  जाते. अबे मशिदीत दाखल झाल्यानंतर  मशिदीमध्ये पंतप्रधान मोदी गाइडची भूमिका बजावतील. 

- दोन देशांचे राष्ट्रप्रमुख मशिदीत येणार असल्याने या मशिदीच्या सजावटीवर विशेष मेहनत घेण्यात आली आहे. मशिदीचे सौदर्य उठून दिसावे यासाठी मशिदीच्या अधिका-यांसह अहमदाबादचे महापालिका आयुक्त आणि पुरातत्व विभागाच्या अधिका-यांनीही मेहनत घेतली आहे. 

- 1572 मध्ये शमसुद्दीन मुजफ्फर शाहच्या शासनकाळात मशिदीचे बांधकाम सुरु झाले. 

- मुजफ्फर शाह गुजरातचा शेवटचा सुल्तान होता. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.