One day tourists will be attracted by Indias beautified toilets says PM narendra Modi | एक दिवस पर्यटक भारतात शौचालयं पाहायला येतील- मोदी
एक दिवस पर्यटक भारतात शौचालयं पाहायला येतील- मोदी

कुरुक्षेत्र: युरोपातील एका ठिकाणी पर्यटक घरांच्या सुंदर रंगवलेल्या भिंती पाहायला जातात. एक दिवस असाही येईल की परदेशी पर्यटक भारतातील शौचालयं पाहण्यासाठी येतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं. ते हरयाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये बोलत होते. एक दिवस देशातील शौचालयं इतकी स्वच्छ आणि सुंदर होतील की ती पाहण्यासाठी परदेशातून पर्यटक गर्दी करतील, असं मोदी म्हणाले. स्वच्छ शक्ती 2019 या कार्यक्रमातून मोदींनी आज महिलांशी संवाद साधला. 
पंतप्रधान मोदींनी हरयाणाच्या कुरुक्षेत्रमधून राज्यातील भाजपाच्या प्रचाराला सुरुवात केली. मोदींचा दौरा राजकीय नसल्याचं राज्य सरकार आणि प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र मोदींनी विरोधकांना लक्ष्य करत प्रचाराचं बिगुल फुंकलं. महिलांना संबोधित करताना पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाचं यश अधोरेखित केलं. 'मी लाल किल्ल्यावरुन स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली, त्यावेळी विरोधकांनी माझी खिल्ली उडवली. त्यावेळी माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांना महिलांची प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत नाही,' असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. 
एक दिवस देशातील शौचालयं पाहण्यासाठी परदेशातून पर्यटक येतील, असं मोदी म्हणाले. 'युरोपात एक ठिकाण आहे. त्या भागातील घरांच्या भिंती अतिशय सुंदर आहेत. त्यांच्यावरील रंगरंगोटी पाहण्यासाठी परदेशी पर्यटक गर्दी करतात. एक दिवस असाही येईल, जेव्हा हिंदुस्तानाच्या गावातील शौचालयं पाहण्यासाठी पर्यटक येतील,' असं मोदींनी म्हटलं. या कार्यक्रमाला नायजेरियाहून आलेले पाहुणे उपस्थित होते. त्यांचं मोदींनी स्वागत केलं. 'स्वच्छ भारत योजनेला मिळालेलं यश पाहण्यासाठी तुम्ही इथं आलात, अशी माहिती मला मिळाली. असंच अभियान तुम्हाला नायजेरियात राबवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या अभियानाला यश मिळो,' असं पंतप्रधान म्हणाले. 


Web Title: One day tourists will be attracted by Indias beautified toilets says PM narendra Modi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.