ओखी वादळ गुजरातच्या दिशेने, नेत्यांच्या सभा रद्द, निवडणूक आयोग चिंतित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 11:00 PM2017-12-05T23:00:54+5:302017-12-05T23:02:04+5:30

तामिळनाडू आणि केरळमध्ये हाहाकार माजवल्यानंतर कोकण आणि गोवा असा प्रवास करत ओखी हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकले आहे. तसेच या वादळामुळे निवडणूक आयोगाची चिंतासुद्धा वाढली आहे.

Oki storm to Gujarat, cancel leaders' meeting, Election Commission concerned | ओखी वादळ गुजरातच्या दिशेने, नेत्यांच्या सभा रद्द, निवडणूक आयोग चिंतित

ओखी वादळ गुजरातच्या दिशेने, नेत्यांच्या सभा रद्द, निवडणूक आयोग चिंतित

Next

अहमदाबाद - तामिळनाडू आणि केरळमध्ये हाहाकार माजवल्यानंतर कोकण आणि गोवा असा प्रवास करत ओखी हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकले आहे. ओखी वादळामुळे समुद्राला उधाण आले असून, वादळी वारे आणि पावसामुळे काँग्रेस आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या प्रचार सभा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच या वादळामुळे निवडणूक आयोगाची चिंतासुद्धा वाढली असून, पहिल्या फेरीतील मतदानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला आहे. 
 ओखी चक्रिवादळामुळे गुजरातमधील निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याविषयी निवडणूक आयोगासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने पहिल्या फेरीतील मतदानाच्या तयारीचा प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे. तसेच राज्य निवडणूक आयुक्तांना ओखी वादळाचा प्रभाव विचारात घेऊन निवडणुकीसाठी पर्यायी योजना तयार ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून, पहिल्या टप्प्यातील मतदान 9 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 14 डिसेंबरला होणार आहे. तर मतमोजणी 18 डिसेंबर रोजी होईल.  
अरबी समुद्रात निर्माण झालेले ओखी चक्रीवादळ ताशी 21 किलोमीटर या वेगाने गुजरातकडे सरकल्यामुळे मुंबईवरचा धोका टळला आहे. चक्रीवादळाचा विपरित परिणामामुळे मंगळवारी दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरांत पडलेल्या पावसामुळे मुंबईचा वेग संथ झाला होता. चक्रीवादळासह पावसामुळे मंगळवारी मुंबईतल्या शाळा बंद ठेवण्यात आल्या असतानाच उर्वरित दैनंदिन व्यवहारही धीम्या गतीने सुरू होते. मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूकही काही अंशी धीम्या गतीने सुरू असतानाच मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकलही स्लो ट्रॅकवर आली होती. 
ओखी चक्रीवादळाचा मुंबईला प्रत्यक्ष फटका बसला नसला तरी हवामान खात्याने दिलेल्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सर्वच आपत्कालीन यंत्रणा सतर्क असल्याने पाऊस वगळता सुदैवाने मुंबईकरांना वादळाला सामोरे जावे लागले नाही. दरम्यान, समुद्रात मुंबईपासून दोनशे किलोमीटर अंतरावर घोंगावत असलेले ओखी चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेन सरकले आहे. 
केरळ आणि तामिळनाडूचे अतोनात नुकसान करणारे ओखी चक्रीवादळ वा-याच्या वेगाने गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातकडे सरकत होते. वादळ जसजसे वेगाने पुढे सरकत होते; तसतसे वा-याचा वेगही काही अंशी कमी होत होता. गोवा आणि महाराष्ट्राच्या किना-यापर्यंत येईस्तोवर वादळाचा वेग ताशी एकवीस किलोमीटर एवढा झाला होता. चक्रीवादळाचा विपरित परिणाम म्हणून राज्यासह मुंबईत पाऊस पडेल, अशी शक्यताही भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली होती. त्यानुसार, सोमवारी दिवसभर मुंबईतले वातावरण ढगाळ राहिले. आणि सायंकाळी सहानंतर सुरु झालेल्या पावसाने आपला मारा मंगळवारी दिवसभर कायम ठेवला.
 

Web Title: Oki storm to Gujarat, cancel leaders' meeting, Election Commission concerned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.