नवी दिल्ली- दिल्लीकरांना पुन्हा एकदा ऑड-इव्हन पॅटर्नला सामोर जावं लागणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने दिल्लीतील गंभीर प्रदुषणाचा मुद्दा लक्षात घेता पुढील आठवड्यापासून ऑड-इव्हन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये १३ ते १७ नोव्हेंबर दरम्यान ऑड-इव्हन पॅटर्नची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दिल्ली सरकारकडून आज दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. या पत्रकार परिषदेत ऑड-इव्हनची औपचारिक घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.  पहिल्यांदा दिल्लीमध्ये १ जानेवारी ते १५ जानेवारी आणि दुसऱ्यांना १५ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान ऑड-इव्हन पॅटर्न लागू करण्यात आला होता.

दुचाकी वाहनांना या ऑड-इव्हन पॅटर्नच्या नियमांमधून वगळण्यात येणार आहे. मागील दोन वेळेसही दुचाकी वाहनांना या नियमांमधून सवलत देण्यात आली होती. 

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाची पातळी पाहता हरित लवादाने केजरीवाल सरकारला चांगलंच फटकारलं होतं. राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली सरकारसह केंद्र सरकारला फटकारत प्रदूषण कमी करण्यासाठी नेमकी काय पावलं उचलली, असा प्रश्न विचारला. दिल्ली शहरातील धुरकं कमी करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून कृत्रिम पाऊस का पाडला नाही, असंही हरित लवादाने विचारलं. दिल्लीतील प्रदूषणाबद्दल केंद्र सरकार आणि शेजारील राज्यांची भूमिका निंदनीय असल्याचं हरित लवादाने म्हटलं. केंद्र आणि शेजारील राज्यं दिल्लीतील प्रदूषणाबद्दल किती गंभीर आहेत, असा प्रश्नही हरित लवादाकडून उपस्थित करण्यात आला.

‘संविधानाने प्रत्येक नागरिकाला स्वच्छ वातावरणात जगण्याचा हक्क दिला आहे. पण योग्य वेळी आवश्यक पावलं न उचलून सरकार नागरिकांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे,’ अशा शब्दांमध्ये राष्ट्रीय हरित लवादाने केंद्रासह राज्य सरकारला फटकारलं.