रायबरेली- उत्तर प्रदेशमधल्या उंचाहार परिसरातील एनटीपीसी प्लँटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट झालाय. या स्फोटात 20 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. एनटीपीसी प्लँटमधील बॉयलरच्या स्टीम पाइपचा स्फोट झाल्यानं ही दुर्घटना घडली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उंचाहार एनटीपीसीमध्ये 500 मेगावॉट युनिटमध्ये हा स्फोट झालाय. घटनास्थळावरून आतापर्यंत 16 मृतदेह ताब्यात घेण्यात आलेत. दुर्घटनेच्या वेळी तिथे जवळपास 500 मजूर काम करत होते. पॉवर प्लँटमधल्या पाइपलाइनवर मोठा दबाव आल्यामुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती रायबरेलीच्या जिल्हाधिका-यांनी दिली आहे. या भीषण स्फोटामुळे लागलेल्या आगीच्या विळख्यात तिथे काम करणारे 20 मजूर सापडले आणि त्यांचा मृत्यू झाला. तर 100हून अधिक प्रवासी जखमी आहेत. एनटीपीसी परिसरात सध्या बाहेरील लोकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.  


स्फोटात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. मात्र, अनेक जण गंभीररीत्या जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश सरकारनेही तात्काळ दखल घेत तातडीनं उपाययोजना केल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या मॉरिशिअसच्या दौऱ्यावर आहेत. परंतु त्यांनी अधिका-यांना बचावकार्य राबवण्याचे आदेश दिले आहेत.  
बॉयलरचा स्टीम पाइप फुटल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. 500 मेगावॉटच्या प्रकल्पात हा स्फोट झाला आहे. अनेक कामगार आगीत होरपळल्याने गंभीर स्वरूपात जखमी झालेत. त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीनं जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात येत आहे. या स्फोटानंतर प्रकल्पाच्या ठिकाणी असलेले कामगार घाबरून सैरावैरा पळत सुटले. सध्या खबरदारी म्हणून एनटीपीसी प्रकल्पाच्या हद्दीत बाहेरच्या लोकांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, काही वेळापूर्वीच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे 32 जवान रायबरेलीला दाखल झाले आहेत. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.