'ती' पावलं 'येती' हिममानवाची नाहीत; नेपाळच्या सैन्यानं शोधलं ठशांमागचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 01:27 PM2019-05-02T13:27:14+5:302019-05-02T13:27:42+5:30

ती पावलं येतीची नव्हे, तर जंगली अस्वलाची असल्याचा खुलासा नेपाळच्या सैन्यानं केला आहे.

Not Yeti, a bear’s footprint: Nepal to Indian Army | 'ती' पावलं 'येती' हिममानवाची नाहीत; नेपाळच्या सैन्यानं शोधलं ठशांमागचं रहस्य

'ती' पावलं 'येती' हिममानवाची नाहीत; नेपाळच्या सैन्यानं शोधलं ठशांमागचं रहस्य

Next

नवी दिल्लीः लोककथांमधील ‘येती’ या रहस्यमय हिममानवाच्या पाऊलखुणा नेपाळमधील मकालु बेसकॅम्पच्या परिसरात आढळल्याचा दावा भारतीय लष्कराने केला, त्यानंतर आता नेपाळ सैन्याच्या प्रवक्त्यानं भारतीय लष्कराचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच ती पावलं येतीची नव्हे, तर जंगली अस्वलाची असल्याचा खुलासा नेपाळच्या सैन्यानं केला आहे. लष्कराच्या अतिरिक्त माहिती महासंचालकांनी सोमवारी रात्री हा दावा करणारे ट्विट केले आणि त्यासोबत बर्फात उमटलेल्या ‘येती’च्या पाऊलखुणांची काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली.

भारतीय लष्कराच्या एका गिर्यारोहण पथकाला 9 एप्रिल 2019 रोजी मकालु बेसकॅम्पच्या परिसरात ‘येती’ या पौराणिक प्राण्याच्या पावलांचे 32 इंच लांब आणि 15 इंच रुंद अशा आकाराचे रहस्यमय ठसे आढळले. परंतु भारतीय लष्कराचा हा दावा नेपाळच्या सैन्याच्या प्रवक्त्यांनी फेटाळून लावला आहे. नेपाळ सैन्याच्या मते, अशा प्रकारची पावलं वारंवार त्या क्षेत्रात दिसत असतात. ती पावलं जंगली अस्वलाची असल्याचा खुलासाही नेपाळच्या सैन्यानं केला. भारतीय लष्कराला येतीच्या पाऊलखुणा दिसल्यापासून आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. तसेच खरंच का ती येतीची पावलं आहेत हे शोधण्याचाही आम्ही प्रयत्न केला. परंतु स्थानिक आणि आमच्या तज्ज्ञांच्या मते ती पावलं जंगली अस्वलाची आहेत, असं नेपाळ लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल बिग्यान देव पांडे यांनी सांगितलं आहे. 

आख्यायिका आणि वास्तव
कपी कुळातील ‘येती’ या रहस्यमय प्राण्याच्या अनेक आख्यायिका नेपाळी लोककथांमध्ये सांगितल्या जातात. त्यानुसार, या ‘हिममानवा’चे वास्तव्य हिमालयात, मध्य आशियात व सैबेरियात आहे. त्याचे वर्णन रानटी, केसाळ प्राणी असे केलेले आढळते.

‘येती’चा अनेक शतके शोध
1920च्या दशकात हिमालयात गेलेल्या सर एडमंड हिलरी यांच्यासह इतरही गिर्यारोहकांनी यात रस घ्यायला सुरुवात केली. 1950च्या दशकात एव्हरेस्ट शिखरावर जाण्याचा पर्यायी मार्ग शोधत असताना, बर्फामध्ये पावलांचे अजब ठसे पाहिल्याचा दावा एरिक शिप्टन या ब्रिटिश गिर्यारोहकाने केला व ‘येती’चा शोध घेण्यात अधिक स्वारस्य निर्माण झाले.‘यती’ला पकडण्यासाठी 1950च्या दशकात नेपाळ सरकारने शिकारीचा रीतसर परावानाही जारी केला होता. 2008मध्ये पश्चिम नेपाळमधील एका पर्वतावरून परत येणा-या जपानी गिर्यारोहकांनीही ‘यती’च्या पावलांचे ठसे दिसल्याचे सांगितले होते. त्यांच्याकडे उत्तम कॅमेरे व दुर्बिणी होत्या, पण त्यांना ‘येती’ कुठे दिसला नव्हता. ‘येती’च्या म्हणून गोळा केलेल्या केस, दात, कातडी व विष्ठेच्या अनेक नमुन्यांची वैज्ञानिकांच्या आंतरराष्ट्रीय चमुने 2017मध्ये ‘डीएनए’ चाचणी केली, पण ते कुत्र्याच्या दाताचा असल्याचे व इतर सर्व नमुने काळ्या व विटकरी अस्वलांचे असल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: Not Yeti, a bear’s footprint: Nepal to Indian Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.