नवी दिल्ली -  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा उचलला आहे. खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी केल्यानंतर आता मराठा असो किंवा पटेल, प्रत्येकाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर महिला आरक्षणाचेही समर्थन करत प्रलंबित विधेयक संसदेत संमत करण्यासाठी सर्वसंमती व्हावी, असे विनंतीही केले आहे.

काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील 'आऊटसोर्सिंग'मध्ये आरक्षण दिल्यानंतर नितीश यांनी या दिशेने आक्रमक भूमिका स्वीकारल्याचे पाहायला मिळत आहे. नितीश यांनी उचलले हे पाऊल राजकारणासाठी असल्याचीही चर्चा सुरू आहे. शिवाय,  संसदेच्या पुढील सत्रात खासगी कंपन्यांमध्ये आरक्षणावरून चर्चा करण्याची त्यांनी सर्व पक्षांकडे मागणी केली आहे.

'गुजरातमध्ये भाजपाचाच विजय'
दरम्यान, गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचा विजय होईल, असा दावाही यावेळी नितीश कुमार यांनी केला. ते म्हणाले की, 'ज्या पद्धतीने जनतेकडून अभिप्राय मिळत आहेत, त्याहून भाजपाचा सहज विजय होईल'. नितीश यांच्या वक्तव्यानंतर गुजरातमध्ये संयुक्त जनता दल (जेडीयू) निवडणूक लढवण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जाते. 
सूत्रांच्या माहितीनुसार, जेडीयू गुजरातमध्ये निवडणूक लढवणार नाही. यापूर्वी जेडीयूनं असे सांगितले होते की,  गुजरातमधील जनाधार पूर्वीपेक्षा चांगला आहे, त्यामुळे पक्ष येथून निवडणूक लढेल असे सांगण्यात आले होते. परंतु, नितीश कुमार यांच्या या वक्तव्यानंतर जेडीयू निवडणूक लढवण्याची शक्यता कमी मानली जात आहे. याआधी जेडीयूने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी माघार घेतली होती.
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.