'Next PM RG': Congress launches proxy campaign for Rahul Gandhi to become PM | 'Next PM RG' : राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच सुरु केला प्रॉक्सी प्रचार

ठळक मुद्देकाँग्रेस कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याविषयी जनमताची चाचपणी सुरु केली आहे. अशा प्रकारच्या चाचपणीमधून लोकांना राहुल गांधींमध्ये नेमके काय हवे आहे त्याची कल्पना येईल.

नवी दिल्ली - पुढच्यावर्षी 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीत  काँग्रेसकडून राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. काँग्रेसने त्यादृष्टीने प्रचार सुरु केला आहे. यावर्षी विविध राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल यांच्याभोवती प्रचार केंद्रीत होईल असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. 

काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याविषयी जनमताची चाचपणी सुरु केली आहे. पुढच्या वर्षी राहुल गांधी आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील याबद्दल कुठलीही शंका नाही. पण लोक याबद्दल काय विचार करतात. त्यांना उत्साह वाटतो का ? हे समजून घेतले पाहिजे. अशा प्रकारच्या चाचपणीमधून लोकांना राहुल गांधींमध्ये नेमके काय हवे आहे त्याची कल्पना येईल आणि निवडणूक रणनिती आखण्यामध्ये मदत होईल असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. 

लोकसभा निवडणुकीआधी अन्य पक्षांबरोबर आघाडी, उमेदवाराची निवड ही समीकरणे सुद्धा महत्वाची आहेत. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांचे नाव थेट जाहीर करण्याआधी लोकांमध्ये त्यांच्या नावावर चर्चा घडवून आणायची आणि वातावरण निर्मिती करण्याची योजना असल्याचे काँग्रेस नेत्याने सांगितले. त्यांना पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींशी सामना करावा लागणार आहे.

राहुल गांधी नेक्सट पीएम ऑफ इंडिया, आरजी नेक्सट पीएम ऑफ इंडिया, नेक्सट पीएम आरजी या फेसबुक पेजेसवरुन काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधींचा प्रचार करत आहेत. लोकांचा या फेसबुक पेजला कसा प्रतिसाद मिळतोय, त्याची माहिती पक्षाला दिली जात आहे. 


Web Title: 'Next PM RG': Congress launches proxy campaign for Rahul Gandhi to become PM
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.