ठळक मुद्देरायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने त्याच शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. ताब्यात घेतलेल्या मुलाला आजच  ज्युवेनाइल कोर्टात हजर केलं जाणार आहे.

गुरूग्राम- रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने त्याच शाळेत अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. ताब्यात घेतलेल्या मुलाला आजच  ज्युवेनाईल कोर्टात हजर केलं जाणार आहे. याप्रकरणी अजून जास्त माहिती देण्यात आलेली नसून सीबीआय आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी याआधी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारला अटक करण्यात आली आहे. अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षा आणि पालक सभा रद्द व्हावी यासाठी प्रद्युम्नची हत्या केल्याचं सीबीआयच्या तपासातून उघड झालं आहे. प्रद्युम्नवर लैंगिक अत्याचार झाला नव्हता, असंही सीबीआयने स्पष्ट केले.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे तो शाळेतील अकरावीच्या वर्गात शिकणार आहे. प्रद्युम्नची हत्या झाली त्यावेळी हा विद्यार्थी शाळेच्या बाथरूमध्ये उपस्थित होता, असा संशय तपास पथकाला आहे. त्यामुळे पुढील तपास करण्यासाठी त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान, माझा मुलगा निर्दोष असून त्याला या प्रकरणात अडकवलं जात असल्याचा दावा विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे. “माझ्या मुलानेच प्रद्युम्नच्या हत्येची माहिती सर्वात आधी शिक्षक आणि शाळेच्या माळ्याला माहिती दिली होती,” असंही त्याच्या वडिलांनी सांगितलं. 'सीबीआयने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत माझी आणि मुलाची चौकशी केली. त्यानंतर मुलाला ताब्यात घेतलं. सीबीआयने आधी पण त्याची चार-पाच वेळा चौकशी केली होती. शिवाय मुलाच्या स्कूलबॅगसह इतर सामानही जप्त केलं होतं. शिवाय गुरुग्राम पोलिसांनीही तपासादरम्यान सीआरपीसीचं कलम 164 अंतर्गत त्याचा जबाब नोंदवला आहे, असंही ते म्हणाले. याविरोधात मी गुरुग्राम कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत आहे, असंही विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?
8 सप्टेंबर रोजी गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या शौचालयात प्रद्युम्न ठाकूरची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.  याप्रकरणी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी अशोक कुमारने हत्या केल्याची कबुली दिली होती.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.