५७ मंत्र्यांसह नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 04:13 AM2019-05-31T04:13:46+5:302019-05-31T04:14:11+5:30

या मंत्रिमंडळात भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि निवृत्त परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा समावेश हे मोदी यांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचे वैशिष्ट्य आहे.

Narendra Modi's second innings begins with 57 ministers | ५७ मंत्र्यांसह नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात!

५७ मंत्र्यांसह नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात!

Next

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात सुमारे साडेसहा हजार मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी संध्याकाळी सात वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी नाव घोषित करण्यात आले आणि त्याबरोबर सर्व बाजूंनी मोदी यांच्या जयजयकाराला सुरुवात झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी यांना पंतप्रधानपदाची आणि त्यांच्या ५७ सहकाऱ्यांना मंत्री व राज्यमंत्रीपदाची शपथ दिली. या शपथविधी समारंभास आलेल्या भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या व कार्यकर्त्याच्या चेहºयावर कमालीचा आनंद दिसत होता. ठरल्याप्रमाणे रात्री ९ वाजता शपथविधी समारंभाची सांगता झाली.

या मंत्रिमंडळात भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि निवृत्त परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा समावेश हे मोदी यांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचे वैशिष्ट्य आहे. मात्र या वेळी अरुण जेटली व सुषमा स्वराज यांचा प्रकृतीच्या कारणास्तव समावेश नाही.

जे. पी. नड्डा, विजय गोयल, जयंत सिन्हा, राजीव प्रताप रुडी, के. अल्फान्स, मनेका गांधी व महेश शर्मा, राज्यवर्धन राठोड यांच्यासह गेल्या मंत्रिमंडळातील ३0 जणांना यंदा स्थान मिळालेले नाही.

महाराष्ट्राचे ‘सात’ साथ है!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचा वाटा एकने कमी झाला असून सात जणांना संधी देण्यात आली आहे. त्यात विद्यमान मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून पुन्हा समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेचे अरविंद सावंत यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. तर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि विदर्भातील अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना राज्यमंत्री पदाची संधी देण्यात आली.

महाराष्ट्रातून भाजपचे पाच तर शिवसेना आणि रिपाइंचे प्रत्येकी एक मंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पाठीशी उभे राहिल्याचे बक्षीस रामदास आठवले यांना मिळाले. यापूर्वी महाराष्ट्रातून आठ मंत्री होते. आता सात आहेत. शिवसेना आणि रिपाइंचे प्रत्येकी एक मंत्रीपद कायम आहे. याचा अर्थ भाजपच्या वाट्याचे एक मंत्रीपद कमी झाले आहे. गेल्या वेळी मंत्री असलेले अनंत गीते आणि हंसराज अहीर या वेळी पराभूत झाले आहेत.

गेल्या वेळी रेल्वे आणि वाणिज्य मंत्री राहिलेले सुरेश प्रभू यांना वगळण्यात आले आहे. राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे धुळे मतदारसंघातून पुन्हा विजयी झाले असले तरी त्यांना दुसऱ्यांदा संधी नाकारण्यात आली आहे. यावेळी संधी मिळालेल्यांपैकी सातपैकी पाच जण हे शहरी भागातील नेते आहेत तर दोघे (रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे) ग्रामीण भागातील नेते आहेत. दानवे सलग पाचव्यांदा तर धोत्रे चौथ्यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. गडकरी, सावंत, दानवे आणि धोत्रे हे चौघे लोकसभेचे तर जावडेकर, गोयल आणि आठवले हे राज्यसभेचे सदस्य आहेत.

१८ खासदार असलेल्या शिवसेनेने तीन मंत्रीपदे मागितली असल्याचे म्हटले जात होते. प्रत्यक्षात या पक्षाला एकच मंत्रीपद देण्यात आले. दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. सावंत यांची ओळख कामगार नेते अशी असून ते निष्ठावान शिवसैनिक व उत्तम वक्ते आहेत.

Web Title: Narendra Modi's second innings begins with 57 ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.