सावधान!; 'नमो' अॅपच्या युजर्सचा 'हा' डेटा थर्ड पार्टीला पुरवला जातोय!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 12:06 PM2018-03-26T12:06:36+5:302018-03-26T12:10:46+5:30

वापरकर्त्यांना अधिक चांगली सेवा पुरवण्यासाठी काही माहिती थर्ड पार्टीला पुरवण्यात येत असल्याची कबुली दिली.

Narendra Modi App asks for sweeping access Camera audio among 22 inputs | सावधान!; 'नमो' अॅपच्या युजर्सचा 'हा' डेटा थर्ड पार्टीला पुरवला जातोय!

सावधान!; 'नमो' अॅपच्या युजर्सचा 'हा' डेटा थर्ड पार्टीला पुरवला जातोय!

googlenewsNext

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून फेसबुकच्या माध्यमातून युजर्सच्या वैयक्तिक माहितीच्या चोरीचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. यानिमित्ताने आता भारतीयांकडून प्रामुख्याने वापरण्यात येणाऱ्या इतर अॅप्सच्या कार्यपद्धतीबद्दलही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे सुरु करण्यात आलेल्या नमो अ‍ॅपवरील डेटाच्या कथित गैरवापराबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. त्यानंतर केलेल्या तपासणीत या अॅपच्या माध्यमातून वापरकर्त्यांनी दिलेल्या 22 मुद्द्यांची माहिती थर्ड पार्टीला पुरवली जात असल्याचे समोर आले आहे. यामध्ये वापरकर्त्याचे लोकेशन, छायाचित्रे , कॉन्टॅक्स, मायक्रोफोन आणि कॅमेरा अशा गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय, पीएमओ इंडिया या अॅपच्या वापरकर्त्यांनी दिलेल्या 14 मुद्द्यांची माहिती परस्पर इतरांना पुरवली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर माहिती व तंत्रज्ञान विभागाचे 'सिटीझन एंगेजमेंट अॅप' आणि 'माय गव्हर्नमेंट अॅप' या दोन्हींच्या माध्यमातून वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीचे साधारण 9 तपशील थर्ड पार्टीपर्यंत पोहोचत असल्याचेही समोर आले आहे. हे सरकारी अॅप्स वगळता भारतीयांकडून प्रामुख्याने वापरण्यात येणाऱ्या अॅमेझॉन इंडिया या अॅपसाठी वापरकर्त्यांना त्यांच्या 17 गोष्टींचा तपशील कंपनीला पुरवावा लागतो. 'पेटीएम'च्याबाबतीत ही संख्या 26 तर दिल्ली पोलिसांच्या अॅपसाठी 25 इतकी आहे. मात्र, सरकारी अॅप्सच्या तुलनेत इतर अॅप्स अनेक सुविधा पुरवतात ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. 

'नमो अॅप'च्या माध्यमातून वापरकर्त्यांना भाजपा सरकारच्या कामगिरीबद्दल माहिती दिली जाते. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा ऑडिओ उपलब्ध करून दिला जातो. मात्र, @fs0c131y या ट्विटर हँडलच्या माध्यमातून नमो अॅपच्या कार्यपद्धतीविषयी काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. 'दि इंडियन एक्स्प्रेस'ने अधिक चौकशी केली असता हे ट्विटर अकाऊंट रॉबर्ट बाप्टिस्ट या फ्रेंच सुरक्षा तज्ज्ञाचे आहे. रॉबर्ट बाप्टिस्ट यांच्या म्हणण्यानुसार नमो अॅपवरील डेटा अमेरिकास्थित क्लेव्हर टॅप या कंपनीला पुरवला जातो. 

यानंतर नमो अॅपशी संबंधित असलेल्या नरेंद्र मोदी.इन या संकेतस्थळाकडून आपले नवीन धोरण जाहीर करण्यात आले. यानुसार वापरकर्त्यांना अधिक चांगली सेवा पुरवण्यासाठी काही माहिती थर्ड पार्टीला पुरवण्यात येत असल्याची कबुली दिली. जेणेकरून वापरकर्त्यांना अधिक अचूक आणि त्यांच्या आवडीची माहिती पुरवता येणे शक्य होईल, असे या नव्या धोरणात म्हटले आहे. याविषयी भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांना विचारले असता त्यांनीही नमो अॅपवरील माहिती थर्ड पार्टीला पुरविली जात असल्याचे कबूल केले. मात्र, ही माहिती कुठेही साठवली अथवा थर्ड पार्टीकडून वापरली जात नाही. वापरकर्त्यांना योग्य संदर्भ पुरवण्यासाठी याचा उपयोग असल्याचे मालवीय यांनी सांगितले. 
 

Web Title: Narendra Modi App asks for sweeping access Camera audio among 22 inputs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.