अमित शहांच्या भेटीनंतर राणेंच्या चेह-यावर ‘स्माईल’! दिल्लीत रात्री उशिरा खलबतं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2018 06:15 AM2018-03-01T06:15:57+5:302018-03-01T10:18:24+5:30

अमित शहांच्या भेटीनंतर नारायण राणे, फडणवीस, शेलार हे तिघंही एकाच गाडीतून जाताना दिसले, पाठोपाठ नितेश राणे बाहेर पडले.

Narayan Rane in delhi meets Amit Shah with cm Fadnavis | अमित शहांच्या भेटीनंतर राणेंच्या चेह-यावर ‘स्माईल’! दिल्लीत रात्री उशिरा खलबतं

अमित शहांच्या भेटीनंतर राणेंच्या चेह-यावर ‘स्माईल’! दिल्लीत रात्री उशिरा खलबतं

googlenewsNext

नवी दिल्ली : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांना भाजपाकडून मंत्रीपद दिलं जाणार असल्याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा आहे. काल रात्री उशीरा राजधानी दिल्लीमध्ये याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. 
भाजपाकडून आयोजित 19 मुख्यमंत्र्यांच्या एका परिषदेला देवेंद्र फडणवीस सकाळीच दिल्लीत पोहोचले होते. मात्र, सायंकाळी दिल्लीत राणेंनीही उपस्थिती लावल्यामुळे विविध चर्चा रंगल्या. भाजपमधील बड्या नेत्यांच्या भेटीसाठी ते दिल्लीत दाखल झाल्याचे बोलले जात होते. अखेर भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी रात्री उशीरा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आणि नारायण राणे यांच्यात चर्चा झाली. दिल्लीतील 11 अकबर रोड येथे जवळपास एक तासाहून जास्त वेळ ही बैठक सुरू होती. दरम्यान, राणे यांचा राज्यात मंत्रीमंडळ प्रवेश करायचा की त्यांना राज्यसभेवर दिल्लीत पाठवायचं यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी नितेश राणे हे देखील उपस्थित होते अशी माहिती आहे.  विशेष म्हणजे शहांच्या भेटीनंतर नारायण राणे, फडणवीस, शेलार हे तिघंही एकाच गाडीतून जाताना दिसले. यावेळी राणेंनी पत्रकारांकडे पाहून एक गोड स्माईल दिली. त्यामुळे राणेंची इच्छापूर्ती झाल्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली.  
पुढच्या महिन्यात राज्यसभा निवडणुका आहेत. महाराष्ट्रातून सहा जागा रिक्त झाल्या आहेत. त्यातील तीन जागा भाजप सहज जिंकू शकणार आहे. त्या दृष्टीनं राणेंना महाराष्ट्रापेक्षा दिल्लीत पाठवण्याचा विचार भाजपकडून सुरू असल्याची चर्चा आहे. अमित शहांसोबत झालेल्या भेटीदरम्यान याबाबत खलबतं झाल्याचं बोललं जात आहे. 
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नारायण राणे यांनी आमदारकी सोडत काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी भाजपच्या सल्ल्याने महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली आणि आपल्या पक्षाचा एनडीएला बिनशर्त पाठिंबा दिला. याबदल्यात त्यांना मंत्रिपद दिले जाईल असे आश्वासन भाजपाने दिल्याचे बोलले गेले. पण अद्यापही भाजपाने राणेंना ताटकळत ठेवलं आहे. 
 

Web Title: Narayan Rane in delhi meets Amit Shah with cm Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.