ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 2 - झारखंडच्या रामगड येथे कथित गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या मुस्लिम व्यक्तीच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी तीन जणांना अटक झाली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक भारतीय जनता पार्टीचा नेता आहे. नित्यानंद महतो असं या भाजपा नेत्याचं नाव आहे. शनिवारी स्थानिक भाजपा कार्यालयातून पोलिसांनी त्याला अटक केली. नित्यानंद महतो हा रामगड भाजपच्या मीडिया सेलचे काम पाहतो. पोलिसांनी नित्यानंद महतो याला भाजपा कार्यालयातून खेचत बाहेर काढल्याचं काही प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे. 
 
29 जून रोजी रामगड येथे जमावाने मांस व्यापारी अलीमुद्दीन अन्सारी यांच्यावर व्हॅन मधून बीफ विकत असल्याच्या संशयावरून हल्ला केला होता.  या घटनेनंतर रामगडमध्ये मोठ्या फ्रमाणात तणावाची स्थिती झाली होती. कलम 144 देखील लागू करण्यात आलं होतं.  या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला होता. या व्हिडिओचे फुटेज पाहून पोलिसांनी नित्यानंद महतो याला अटक केली आहे. मात्र, महतोने आपण पोलीस प्रशासन तिथे पोहोचल्यानंतर आल्याचे सांगितले. मी तिथे काय झालं होते हे पाहण्यासाठी गेलो होतो, असे त्याने पोलिसांना सांगितलं आहे.
 
यापुर्वी पोलिसांनी संतोष सिंह नावाच्या व्यक्तीवर खुनाचा आरोप दाखल करत त्याला अटकही केली होती. त्याशिवाय आणखी एकाला अटक करण्यात आली होती.
 
अलीमुद्दीनची पत्नी मरीयम ख़ातून यांनी या प्रकरणी  12 लोकांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यापैकी 9 जण अजूनही फरार आहेत. घटनेनंतर वाढता तणाव पाहून राज्य सरकारने मृतकाच्या कुटुंबाला 2 लाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली आहे पण कुटुंबियांनी कारवाईची मागणी केली आहे.