‘Modilie’: No such word exists, Oxford Dictionary tells Rahul Gandhi | राहुल गांधींनी सांगितलेला 'तो' शब्द अस्तित्वातच नाही, ऑक्सफोर्ड डिक्शनरीचा खुलासा
राहुल गांधींनी सांगितलेला 'तो' शब्द अस्तित्वातच नाही, ऑक्सफोर्ड डिक्शनरीचा खुलासा

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोप हे झडतच असतात. अनेकदा राहुल गांधी भाजपा आणि मोदींवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळतात. राहुल गांधी यांनी इंग्रजी डिक्शनरीमध्ये Modilie (मोदी लाय) नावाचा नवा शब्द समाविष्ट झाला असल्याचं ट्वीट केलं होतं. त्या ट्विटखाली त्यांनी Modilie या शब्दाचे काही अर्थही सांगितला होता. परंतु राहुल गांधींचा तो दावा ऑक्सफोर्ड डिक्शनरीनं फेटाळून लावला आहे. Modilie (मोदी लाय) नावाचा कुठलाच शब्द अस्तित्वात नसल्याचं स्पष्टीकरण ऑक्सफोर्ड डिक्शनरीनं दिलं आहे.

सत्याची सातत्याने मोडतोड करणे, सवयीने थापा मारणे, न थकता खोटं बोलणे असा अर्थ मोदी लाय या शब्दाचा असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. या आधीही राहुल यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर टीका करताना  'Jaitlie' शब्द वापरला होता. Modilie (मोदी लाय) या शब्दावरून भाजपानंही राहुल गांधीवर निशाणा साधला होता. राहुल गांधींच्या अशा वागण्यामुळे काँग्रेस पक्षाची अधोगती होत आहे. त्यामुळे राहुल मोठा हो असा टोला भाजपाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लगावला होता.


उज्जैनमधल्या लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस उमेदवार बाबुलाल मालवीय आपलं नशीब आजमावत आहेत. त्यांच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले, आम्ही कोणाचाही द्वेष करत नाही. भारतातील सर्वच लोक आमचे आहेत. मोदी नेहमीच द्वेषानं बोलतात. माझ्या वडिलांचा अपमान करतात. आजी आणि पणजोबांबद्दल वाईट वाईट बोलतात. तरीसुद्धा मी कधीही त्यांच्या कुटुंबीयांबद्दल वाईट बोलणार नाही. त्यांच्या आई-वडिलांबाबत अपशब्द काढणार नसल्याचंही राहुल गांधींनी सांगितलं. मी आरएसएस आणि भाजपाचा माणूस नाही. मी काँग्रेसचा माणूस आहे. मोदींनी माझा जेवढा द्वेष केला आहे, त्याला मी प्रेमानं उत्तर देणार आहे. मी त्यांची गळाभेट घेऊन त्यांना प्रेम शिकवेन, याचा उल्लेखही राहुल गांधींनी आवर्जून केला होता. 
 


Web Title: ‘Modilie’: No such word exists, Oxford Dictionary tells Rahul Gandhi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.