हरिश गुप्ता 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तत्पूर्वी, द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष आणि करुणानिधींचे चिरंजीव एम. के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान मोदी यांचे निवासस्थानी स्वागत केले. त्यांच्या या भेटीमुळे अण्णा द्रमुकचे नेते अस्वस्थ झाले आहेत, तर तामिळनाडूमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. इतकेच नव्हे, तर भाजपामध्येही काहीशी खळबळ माजली आहे.
राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या पुढाकारामुळेच ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये केवळ अण्णा द्रमुकशी संबंध न ठेवता, द्रमुकशीही तितकाच सलोखा ठेवावा, या विचारातून मोदी यांनी ही भेट घेतल्याचे समजते. मात्र, ती घडवून आणण्याचे काम नवनियुक्त राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यामुळे शक्य झाले, असे कळते.
या भेटीद्वारे पंतप्रधान मांदी यांनी स्वदेशी जागरण मंचाचे प्रमुख एस. गुरुमूर्ती यांनाही धक्का दिल्याचे मानले जाते. आतापर्यंत भाजपाचे तामिळनाडूतील राजकारण गुरुमूर्ती यांच्या सांगण्यावरून चालत असे. अण्णा द्रमुक व भाजपाचे दिल्लीतील नेतृत्व यांच्यातील गुरुमूर्ती हेच दुवा होते.
संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, राज्यमंत्री पी. राधाकृष्णन आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तामिलीसाई सुंदरराजन यांची उपस्थिती होती. व्हीलचेअरवर असलेल्या करुणानिधी यांच्याजवळ बसून मोदी यांनी त्यांची चौकशी केली. करुणानिधींची मुलगी कणिमोळी यांच्यासह द्रमुकचे अन्य नेतेही या वेळी हजर होते. अण्णा द्रमुकशी मैत्री असताना, मोदी यांनी द्रमुक नेत्यास भेटण्याचे कारण काय, अशी चर्चा इथे सुरू आहे.
काँग्रेसच्या १८ पक्षांच्या आघाडीमध्ये करुणानिधी यांचा पक्ष आहे. त्या पक्षाला काँग्रेसमधून दूर करणे, हेही मोदी यांच्या भेटीचे एक कारण आहे. या आधी बिहारमधील नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलालाही मोदी यांनी काँग्रेसपासून दूर केले आणि तिथे नितीश यांच्यासमवेत भाजपा सत्तेत सहभागी झाला. काँग्रेसपासून मित्रांना दूर करणे हा मोदी यांच्या रणनीतीचा भाग आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.