मोदी माझ्यापेक्षाही उत्तम प्रवक्ते, राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदींची स्तुती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 01:03 PM2017-09-12T13:03:10+5:302017-09-12T13:03:10+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यापेक्षा उत्तम प्रवक्ते आहेत अशी कबुली काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बर्कले येथील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियातील विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यापेक्षा चांगले प्रवक्ते असल्याचं मान्य केलं

Modi is better spokesman than me, Rahul Gandhi praises PM Modi | मोदी माझ्यापेक्षाही उत्तम प्रवक्ते, राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदींची स्तुती

मोदी माझ्यापेक्षाही उत्तम प्रवक्ते, राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदींची स्तुती

Next
ठळक मुद्दे'पंतप्रधान मोदींकडे काही कौशल्य आहेत. नरेंद्र मोदी माझ्यापेक्षाही उत्तम प्रवक्ते आहेत''मला वाटतं मोदी ज्यांच्यासोबत काम करतात त्यांची मतं जाणून घेत नाही. संसदेतील खासदार आणि भाजपातील लोकही हे सांगत असतात', असा टोला राहुल गांधींनी लगावला'भाजपाने वरुन खाली पोहोचण्याचं व्हिजन दिलं आहे. आम्ही तळापासून वर पोहोचण्याचं व्हिजन तयार केलं आहे'

वॉशिंग्टन, दि. 12 - पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यापेक्षा उत्तम प्रवक्ते आहेत अशी कबुली काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बर्कले येथील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियातील विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यापेक्षा चांगले प्रवक्ते असल्याचं मान्य केलं. मात्र स्तुती करण्याच्या बहाण्याने त्यांनी मोदींवर टीका करण्याची संधीही सोडली नाही. 

'पंतप्रधान मोदींकडे काही कौशल्य आहेत. नरेंद्र मोदी माझ्यापेक्षाही उत्तम प्रवक्ते आहेत', असं राहुल गांधी सुरुवातीला बोलले. 'गर्दीतील तीन ते चार वेगवेगळ्या गटांपर्यंत आपला संदेश कसा पोहोचवायचा हे मोदींना चांगलंच माहिती आहे. आपला संदेश पोहोचवण्याची त्यांची क्षमता प्रभावी आणि जटिल आहे', असं राहुल गांधी बोलले. नंतर पुढे बोलताना त्यांनी टीका करण्यास सुरुवात केली.



पंतप्रधान नरेंद्र मोदी एकतर्फी निर्णय घेतात अशी टीकाही राहुल गांधींनी केली आहे. 'मला वाटतं मोदी ज्यांच्यासोबत काम करतात त्यांची मतं जाणून घेत नाही. संसदेतील खासदार आणि भाजपातील लोकही हे सांगत असतात', असा टोला राहुल गांधींनी लगावला. 'भाजपाने वरुन खाली पोहोचण्याचं व्हिजन दिलं आहे. आम्ही तळापासून वर पोहोचण्याचं व्हिजन तयार केलं आहे', असं राहुल गांधींनी सांगितलं. यासाठी राहुल गांधी जम्मू काश्मीरचं उदाहरण द्यायला विसरले नाहीत. 


'नऊ वर्ष मी पडद्यामागून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पी चिदंबरम, जयराम रमेश यांच्यासोबत जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर काम केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये दहशतवादाला जागा करुन दिली', असा आरोप राहुल गांधींनी केला. गतवर्षीपासून जम्मू काश्मीर खो-यात हिंसाचार वाढल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. 


'आम्ही जेव्हा काश्मीरमध्ये काम करण्यास सुरुवात केली तेव्हा दहशतवाद उफाळला होता. जेव्हा आम्ही काम पुर्ण केलं तेव्हा शांतता प्रस्थापित झाली होती. आम्ही दहशतवादाचं कंबरडं मोडलं होतं', असा दावा राहुल गांधींनी केला आहे. '2013 मध्ये काँग्रेस सरकार सत्तेत असताना काश्मीरमध्ये दहशतवाद संपवला होता. मी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मिठी मारुन हे आपलं खूप मोठं यश असल्याचं सांगितलं होतं', असं राहुल गांधींनी सांगितलं. 




राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नोटाबंदी निर्णयावरुन पुन्हा टीका केली. संसद व मुख्य आर्थिक सल्लागारांना विचारात न घेता अंमलात आणलेल्या नोटाबंदी व जीएसटीसारख्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम झाला आहे.  यामुळे जीडीपीमध्ये घसरण झाल्याचेही राहुल गांधी यावेळी म्हणालेत. शिवाय, देशात सांप्रदायिक आणि ध्रुवीकरण करणा-या शक्ती डोकं वर काढत असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला आहे.  हिंसेमुळे मी माझ्या वडील, आजीला गमावलं आहे. मला माहिली आहे की हिंसेमुळे काय नुकसान होते. कोणत्याही व्यक्तीविरोधात हिंसा होऊ नये. जेव्हा तुम्ही जवळच्या माणसांना गमावता, तेव्हा तुम्हाला खोल जखमा होतात, असेही यावेळी राहुल गांधी म्हणालेत. 'हिंसाचाराच्या घटना आता मुख्य प्रवाहाचा भाग झाल्या आहेत आणि हा प्रकार अतिशय भयंकर आहे. अहिंसेच्या विचारांवरच हल्ले सुरू आहेत. अहिंसेमुळेच मानवता जिवंत राहू शकते. मात्र त्याच विचारधारेला लक्ष्य केले जात आहे,' या शब्दांमध्ये राहुल गांधींनी देशातील परिस्थितीवर भाष्य केले.

..तर पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास मी तयार - राहुल गांधी 
दरम्यान, यावेळी राहुल गांधींनी पहिल्यांदाच म्हटले आहे की, पक्षाने आदेश दिल्यास पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास मी तयार आहे. शिवाय, 2012मध्ये काँग्रेस पक्षामध्ये अहंकार निर्माण झाला होता आणि पक्षानं जनतेशी संवाद कमी केल्याने लोकं दुरावली. लोकांसोबतच संवाद कमी होत गेल्यानेच काँग्रेसला पराभव पत्करावा लागला, असे मतही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केले.    


घराणेशाहीवर राहुल गांधी म्हणाले...
भारतात बहुतांश राजकीय पक्षांमध्ये घराणेशाहीची समस्या आहे. यावरुन केवळ आमच्यावरच निशाणा साधण्यात येऊ नये. घराणेशाहीचं उदाहरण देताना त्यांनी अखिलेश यादव यांच्यासहीत अभिषेक बच्चन यांच्याही नावाचा उल्लेख केला.  अंबानी आपला बिझनेस चालवत आहेत इन्फोसिस त्यांचा व्यवसाय चालवत आहेत. तर एकूण भारतात हे असेच चालतच आले आहे.  मला काँग्रेस पक्षात बदल हवे आहेत. जर तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये पाहिले तर मोठ्या संख्येत अशी लोकं आहेत, जी घराणेशाहीपासून आलेली नाहीत. पण काही असेही आहेत ज्यांचे वडील, आजोबा-आजी राजकारणात होते. मी यावर काहीही करू शकत नाही. मात्र खरा प्रश्न असा आहे की संबंधित व्यक्ती सक्षम आहे का? संवेदनशील आहे का? हा खरा प्रश्न आहे, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. 


Web Title: Modi is better spokesman than me, Rahul Gandhi praises PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.