मोदींनी करुणानिधींना विचारले आमच्यासोबत आघाडी कराल का? स्टॅलिन यांनी दिले असे उत्तर

By ऑनलाइन लोकमत on Thu, November 09, 2017 3:38pm

मोदींनी आमच्यासोबत आघाडी कराल का अशी विचारणा करुणानिधी यांच्याकडे केली होती. आता डीएमकेचे नेते आणि करुणानिधींचे पुत्र स्टॅलिन यांनी मोदींच्या प्रस्तावास उत्तर दिले आहे.

चेन्नई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांची सोमवारी भेट घेतल्याने तामिळनाडूबरोबरच देशाच्या राजकारणातही अनेकांना धक्का बसला होता. या भेटीदरम्यान मोदींनी आमच्यासोबत आघाडी कराल का अशी विचारणा करुणानिधी यांच्याकडे केली होती. आता डीएमकेचे नेते आणि करुणानिधींचे पुत्र स्टॅलिन यांनी मोदींच्या प्रस्तावास उत्तर दिले आहे. भाजपाने दिलेल्या प्रस्तावाला आता फार उशीर झाला आहे, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.   नरेंद्र मोदींनी करुणानिधी यांची चेन्नईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना दिल्लीला आपल्या निवासस्थानाला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. त्याच भेटीदरम्यान मोदी आणि करुणानिधींमध्ये संभावित आघाडीबाबत चर्चा झाली होती. भाजपा आणि डीएमके आघाडीसाठी भाजपा नेते उत्सुक आहे. मात्र डीएमके नेत्यांच्या मते अशा आघाडीसाठी आता फार उशीर झाला आहे.  तामिळनाडूमध्ये सध्या अण्णा द्रमुकसोबत भाजपाची आघाडी आहे. मात्र ओपिनियन पोलमध्ये आगामी निवडणुकांमध्ये अण्णा द्रमुकची कामगिरी चांगली होणार नाही असा वर्तवण्यात आल्याने भाजपा तामिळनाडूबाबत आपल्या रणनीतीमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे.  याआधी 1999 ते 2004 या काळात द्रमुक पक्ष भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआमध्ये सहभागी होता. मात्र 2004 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी द्रमुकने रालोआला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये प्रवेश केला होता.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती.  त्यांच्या या भेटीमुळे अण्णा द्रमुकचे नेते अस्वस्थ झाले आहेत, तर तामिळनाडूमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. इतकेच नव्हे, तर भाजपामध्येही काहीशी खळबळ माजली आहे. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या पुढाकारामुळेच ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये केवळ अण्णा द्रमुकशी संबंध न ठेवता, द्रमुकशीही तितकाच सलोखा ठेवावा, या विचारातून मोदी यांनी ही भेट घेतल्याचे समजते. मात्र, ती घडवून आणण्याचे काम नवनियुक्त राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यामुळे शक्य झाले, असे सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या १८ पक्षांच्या आघाडीमध्ये करुणानिधी यांचा पक्ष आहे. त्या पक्षाला काँग्रेसमधून दूर करणे, हेही मोदी यांच्या भेटीचे एक कारण आहे. या आधी बिहारमधील नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलालाही मोदी यांनी काँग्रेसपासून दूर केले आणि तिथे नितीश यांच्यासमवेत भाजपा सत्तेत सहभागी झाला. काँग्रेसपासून मित्रांना दूर करणे हा मोदी यांच्या रणनीतीचा भाग आहे.

राष्ट्रीय कडून आणखी

अयोध्येत राम मंदिर बांधू नका - शिवपाल यादव  
शुद्रांनो, इंग्रजीची कास धरा; ब्राह्मणांना संस्कृत शिकवायला पाठवा - कांचा इलय्या
विजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाचे संयुक्त पथक ब्रिटनला रवाना 
Happy Birthday Sonia Gandhi : सोनिया गांधींवर शुभेच्छांचा वर्षाव!
उद्या होणार होते DMसोबत लग्न, त्याआधीच DIGच्या मुलीने केली आत्महत्या

आणखी वाचा