शहांचे ‘मिशन १५०’ तूर्तास स्वप्नच, गुजरातची निवडणूक भाजपासाठी नाही सोपी, अनेक भागांमध्ये काँग्रेसचे तगडे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 02:27 AM2017-11-27T02:27:57+5:302017-11-27T02:28:01+5:30

सोमनाथ मंदिराच्या परिसरात उभा असताना सहज मनात विचार येतो की, भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे मिशन -१५० चे काय होईल? हे स्वप्न साकार होईल काय? हा प्रश्न उपस्थित होण्यामागचे कारण असे आहे की, ही तीच जागा आहे जेथून भाजपची घोडदौड सुरु झाली होती.

'Mission 150' of Swachh Bharat, Gujarat's election is not easy for the BJP, Congress's strong challenge in many parts | शहांचे ‘मिशन १५०’ तूर्तास स्वप्नच, गुजरातची निवडणूक भाजपासाठी नाही सोपी, अनेक भागांमध्ये काँग्रेसचे तगडे आव्हान

शहांचे ‘मिशन १५०’ तूर्तास स्वप्नच, गुजरातची निवडणूक भाजपासाठी नाही सोपी, अनेक भागांमध्ये काँग्रेसचे तगडे आव्हान

Next

- विकास मिश्र

सोमनाथ/ जुनागढ : सोमनाथ मंदिराच्या परिसरात उभा असताना सहज मनात विचार येतो की, भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे मिशन -१५० चे काय होईल? हे स्वप्न साकार होईल काय? हा प्रश्न उपस्थित होण्यामागचे कारण असे आहे की, ही तीच जागा आहे जेथून भाजपची घोडदौड सुरु झाली होती. १९९० मध्ये लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा सुरु केली आणि त्यानंतर भाजपने मागे वळून पाहिले नाही.
या रथयात्रेची माहिती त्यावेळी मीडियाला देणारे गुजरात भाजपचे तत्कालीन महासचिव नरेंद्र मोदी यांचे मोठे वर्चस्व आहे. गत निवडणुकीत सोमनाथ येथून काँग्रेसचे जसाभाई धानाभाई बराद यांनी निवडणूक जिंकली होती. यावेळी भाजपने जसाभाई यांनाच पक्षात घेतले आणि उमेदवारी दिली. काँग्रेसने विमालभाई चुडासमा यांना मैदानात उतरविले. जसाभाई यांची ताकद मोठी असली तरी विजय सोपा नाही. कारण, काँग्रेस समर्थक कमी नाहीत. येथील चहाविक्रेते भाटाभाई आठवण करुन देतात की, २०१२ मध्ये मोदी लाटेतही येथे काँग्रेसचा विजय झाला होता.
राज्यसभेसाठी निवड झाल्यावर अमित शहा यांनी म्हटले होते की, गुजरातेत १५० उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवणार आहे. जेणेकरुन राज्यसभेच्या निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागू नये. १५० जागांचे हे स्वप्न पूर्ण होणार काय? असा सवाल कच्छ व सौराष्ट्र भागात शहरापासून ग्रामीण भागात अनेक जणांना केला. पण, असा एकही व्यक्ती भेटला नाही ज्याचे उत्तर सकारात्मक होते.

लाखो सदस्यांचा शोध
दिल्लीत सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने देशात मिस कॉलच्या माध्यमातून नवे सदस्य बनविले. गुजरातमध्ये असे ५० लाख सदस्य आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता यातील बरेच नंबर बंद असल्याचे दिसून आले आहे. अशा गायब मतदारांची संख्या १२ ते १५ टक्के आहे.

विकास वेडा झाला नाही
निवडणुकीतील अंदाज घेण्यासाठी आतापर्यंत मी १९०० किमीचा प्रवास केला आहे. मात्र, रस्त्यांवर एकूण १०० खड्डेसुद्धा नाही दिसले. महाराष्ट्रात असे रस्ते फक्त कल्पनेतच आहेत. गुजरातमध्ये बहुतांश राज्यमार्ग चार पदरी आहेत. भुजपासून मांडवी, अंजार, गांधी धाम, पोरबंदर, जुनागढ, राजकोटपर्यंत अनेक भागात औद्योगिक क्रांती दिसून येत आहे.

जीएसटीचा किती परिणाम?
यावेळी मी अनेक व्यापाºयांकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, जीएसटीमुळे त्यांना त्रास झाला आहे काय? ते भाजप सरकारवर नाराज आहेत काय? विशेष म्हणजे यावर कोणीही मोकळेपणाने काही बोलले नाही. अनेक व्यापारी तर फक्त हसून गप्प राहतात. '

अनिवासी पटेल करणार भाजपाचा प्रचार

अहमदाबाद : गुजरातमधील हार्दिक पटेल याच्या नेतृत्वाखालील पटेल समुदाय काँग्रेससोबत जाताना दिसत असल्याने भाजपाने अनिवासीय भारतीय (एनआरआय) पटेलांना आपल्या बाजूने वळविले आहे. सुमारे १५0 अनिवासी पटेल भाजपचा प्रचार करणार आहेत.
गुजरातमध्ये पटेलांची संख्या १४ टक्के आहे. दोन दशके हा समुदाय भाजपाच्या पाठीशी आहे. यावेळी मात्र पाटीदार अनामत आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याच्या नेतृत्वाखाली पटेल समुदाय काँग्रेसबरोबर आहे. पटेलांना आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपने आता एनआरआय पटेलांची मदत घेण्याची खेळी केली आहे. सूत्रांनी सांगितले की, अमेरिका आणि आॅस्ट्रेलियात राहणारे पटेल निवडणुकीच्या काही आठवडे आधी गुजरातेत येऊन आपापल्या जिल्ह्यात भाजपसाठी प्रचार करतील. गुजरातेत भाजपची २२ वर्षांपासून सत्ता आहे.
यापैकीच एक आहेत बाबूभाई लाल पटेल. तिशीत असताना त्यांनी भडोच जिल्ह्यातील आपले गाव सोडून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयाण केले होते. आता ७७ वर्षांचे असलेले बाबूभाई यांचे अमेरिकेत एक रेडिओ स्टेशन असून, हॉटेल व्यवसायात ते स्थिर झाले आहेत. ते गुजरातेत भाजपचा प्रचार करणार आहेत. ते म्हणाले की, भाजपसमर्थक एनआरआय पटेलांचे चांगले नेटवर्क असून, आम्ही फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहोत. आमच्या नेटवर्कमध्ये डॉक्टर, प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ आहेत. पटेलांनी भाजपसोबतच राहावे यासाठी आम्ही प्रचार करू.

हार्दिकही काँग्रेसशी संबंधित होता

मूळचे सुरतेतील असलेले आणखी एक एनआरआय सुरेश पटेल यांनी सांगितले की, हार्दिकचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते होते. हार्दिकचाही काँग्रेसशी संबंध होता. नंतर तो आपसोबतही गेला. आता त्याचा स्वत:चा पास (पाटीदार अनामत आंदोलन समिती) हा पक्ष आहे.

Web Title: 'Mission 150' of Swachh Bharat, Gujarat's election is not easy for the BJP, Congress's strong challenge in many parts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.