ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्ताननं भारताचा 180 धावांनी लाजिरवाणा पराभव केला. त्यानंतर काश्मीरमधील हुर्रियत नेता मिरवाईज उमर फारुखचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हुर्रियत नेता मिरवाईज उमर फारुखने पाकिस्तान संघाला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्यानंतर भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 

मिरवाईज उमर फारुख पाकिस्तानच्या विजयानंतर ट्विट करत म्हणाला, आजूबाजूच्या भागात फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे. ईद जवळ आल्याचंच भासत आहे. चांगली खेळी केलेल्या संघानं विजय मिळवला. पाकिस्तान टीमचं अभिनंदन. मिरवाईज उमर फारुखच्या या ट्विटनंतर गंभीर प्रचंड संतापला. त्यानं मिरवाईज यालासुद्धा त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे.

गंभीर मिरवाईजला उद्देशून म्हणाला, माझा तुम्हाला एक सल्ला आहे. मिरवाईज तू नियंत्रण रेषा का ओलांडत नाहीस ? तुला तिथे चांगल्या प्रतीचे (चायनीज) फटाके सापडतील. ईद तिथेच साजरी केली जाते. मी तुझं सामान बांधून देईन. मिरवाईजच्या प्रकरणात गौतम "गंभीर" झाल्यामुळे या वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे. गौतम गंभीरचं हे ट्विट जवळपास 10 हजारांपेक्षा अधिक युझर्सनं रिट्विट केलं आहे. या ट्विटरला 3 हजारांहून अधिक लोकांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्या ट्विटमध्ये काहींनी गंभीरची बाजू घेतली आहे. तर काही युझर्सनं गंभीरवर टीका केली आहे. तसेच दोन हजारांहून अधिक लोकांनी ते ट्विट लाइक केले आहे.

मिरवाईजने याआधी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानी संघाने प्रवेश केल्यामुळे ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन केले होते. पाकिस्तानने इंग्लंडला पराभवाची धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश मिळवल्यावर मिरवाईजने पाकिस्तानचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.