मोदी सरकार पार्ट-2 मध्ये बदलणार मंत्र्यांचे चेहरे; शहांना कोणतं खातं देणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 03:08 PM2019-05-24T15:08:39+5:302019-05-24T15:10:17+5:30

नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये यंदा नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते तर जुन्या चेहऱ्यांना नाकारलं जाण्याची शक्यता आहे.

Minister's faces will change Modi government in Part -2 | मोदी सरकार पार्ट-2 मध्ये बदलणार मंत्र्यांचे चेहरे; शहांना कोणतं खातं देणार?

मोदी सरकार पार्ट-2 मध्ये बदलणार मंत्र्यांचे चेहरे; शहांना कोणतं खातं देणार?

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची संधी दिली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मोदी लाट आणखी जोराने वाढून विरोधकांना भुईसपाट केल्याचं दिसून आलं. अबकी बार 300 पार ही घोषणा खरी ठरवत मोदींनी 303 जागांवर विजय मिळविला आहे. प्रचंड बहुमताच्या जोरावर देशात एनडीए सरकार पुन्हा स्थापन होणार आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या या पार्ट 2 मध्ये मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळते याची चर्चा सध्या सुरु आहे. 

नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये यंदा नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते तर जुन्या चेहऱ्यांना नाकारलं जाण्याची शक्यता आहे. त्याचसोबत भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे कोणाच्या हाती जाणार हेदेखील काही दिवसांत कळणार आहे. भाजपाच्या अभूतपूर्व यशानंतर मंत्रिमंडळातील चेहऱ्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ज्यांनी मोदींच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला अशा नेत्यांना महत्त्वाची खाती मिळू शकतील. पंतप्रधानपदानंतर गृह मंत्रालय, अर्थ मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय ही खाती कोणत्या नेत्याला मिळतील यावर सध्या चर्चा सुरु आहे. 

अमित शहांना गृह खातं मिळण्याची शक्यता 
मोदी कॅबिनेटमध्ये गुजरातचे गृहमंत्री राहिलेले अमित शहा यंदाच्या निवडणुकीत भाजपा अध्यक्ष म्हणून विजयात मोठी कामगिरी बजावली आहे. उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीतही अमित शहांनी चाणक्यनीतीने अनेक जागा मिळविल्या होत्या. भाजपा अध्यक्ष म्हणून त्यांच्या काळात भाजपाच्या यशाचा आलेख कायम चढता राहिला आहे. त्याचाच परिणाम म्हणून यंदाच्या सरकारमध्ये अमित शहा यांना गृह मंत्रालय सांभाळण्यासाठी दिलं जाऊ शकतं असं बोललं जातंय. त्यामुळे आधीच्या मंत्रिमंडळात असणारे राजनाथ सिंह यांच्या खात्यात बदल होऊ शकतो. 

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण?
अमित शहा यांच्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण होईल याबाबत अनेक तर्क लढविले जात आहेत. भाजपाच्या विजयानंतर दिल्ली मुख्यालयात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. यावेळी उपस्थित असणारे केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांना ही जबाबदारी सोपविण्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे नितीन गडकरी यांच्या नावाचीही अध्यक्षपदासाठी चर्चा आहे. 

सुषमा स्वराज यांच्याजागी कोण?
 वाजपेयींच्या कार्यकाळात महत्त्वाच्या मंत्री असलेल्या सुषमा स्वराज यांना मागील मोदींच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. वाढत्या वयामुळे परराष्ट्र खात्याचा कारभार, विदेश दौरे करणं अडचणीचं होतं. त्यामुळे सुषमा स्वराज यांचे खाते कोणाला देणार यावर विचार सुरु आहे. 

अर्थ खाते पियुष गोयलांना मिळण्याची शक्यता
मागील पाच वर्षात आर्थिक धोरणांमुळे मोदी सरकारला टीकेचं लक्ष्य व्हावं लागलं. त्यामुळे अर्थ खात्याची जबाबदारी वाढली आहे. अरुण जेटली यांचीही तब्येत मागील काही काळापासून खराब आहे. जेटली ज्यावेळी परदेशात उपचारासाठी गेले तेव्हा हे खातं पियुष गोयल यांच्याकडे तात्पुरतं सोपविण्यात आलं होतं. मोदी सरकारचा शेवटचा बजेट गोयल यांनीच मांडला. त्यामुळे हे जबाबदारीचं खातं गोयल यांच्याकडे सोपविण्याचा विचार होऊ शकतो. 
 

Web Title: Minister's faces will change Modi government in Part -2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.