सैन्य, युद्धसाहित्याची झटपट व्यूहरचना करणे होणार शक्य, रेल्वेच्या सहकार्याने लष्कराची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 02:44 AM2018-03-12T02:44:18+5:302018-03-12T02:44:18+5:30

देशाच्या पूर्व सीमेवरून पश्चिम सीमेपर्यंत सैन्य, युद्धसाहित्य आणि रसद यांची झटपट व कार्यक्षम वाहतूक करण्यासाठी भारतीय लष्कराने रेल्वेच्या मदतीने वेगवान पावले उचलली आहेत. त्यामुळे पाकिस्तान व चीनला लागून असलेल्या सीमा भागात लष्करी मदत जलदीने पोहोचविणे आणखी सुकर होईल.

military and war strategy can be done quickly, with the cooperation of the Railway | सैन्य, युद्धसाहित्याची झटपट व्यूहरचना करणे होणार शक्य, रेल्वेच्या सहकार्याने लष्कराची योजना

सैन्य, युद्धसाहित्याची झटपट व्यूहरचना करणे होणार शक्य, रेल्वेच्या सहकार्याने लष्कराची योजना

Next

नवी दिल्ली  - देशाच्या पूर्व सीमेवरून पश्चिम सीमेपर्यंत सैन्य, युद्धसाहित्य आणि रसद यांची झटपट व कार्यक्षम वाहतूक करण्यासाठी भारतीय लष्कराने रेल्वेच्या मदतीने वेगवान पावले उचलली आहेत. त्यामुळे पाकिस्तान व चीनला लागून असलेल्या सीमा भागात लष्करी मदत जलदीने पोहोचविणे आणखी सुकर होईल. २००१ साली आॅपरेशन पराक्रम दरम्यान लष्करी सामुग्रीच्या दळणवळणास विलंब लागला होता. त्यापासून लष्कराने धडा घेतला.
रणगाडे, हॉवित्झर तोफा, लष्कराची अन्य चिलखती वाहने मालगाड्यांमध्ये लादण्यासाठी रेल्वेने अरुणाचल प्रदेशमधील भलुकपाँग, नागालँडमधील दिमापूर व सिलापथर, आसाममधील मिस्सामारी, मुर्कोंगसेलेक या ठिकाणी काँक्रिटचे रॅम्प बांधले आहेत. त्याचबरोबर, खास लष्करी मालगाड्यांचा वेग कसा वाढविता येईल, याच्याही चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे चीनलगतच्या सीमेवर जलदगतीने सैन्य व युद्धसामुग्रीची वाहतूक करणे सुलभ होईल. लष्करी तुकड्या व सामग्रीची ने-आण करण्यासाठी लष्कर दरवर्षी ७०० ते ८०० रेल्वेगाड्यांचा वापर करते. त्यापोटी लष्कर दरवर्षी दोन हजार कोटी रुपये रेल्वेला देते.

लष्करी सामग्रीच्या दळणवळणासाठी काही ठिकाणी रेल्वे देखील स्वत: खर्च करते.
लष्कराच्या मालकीच्या ५ हजार रेल्वे वॅगन असून, वाहतुकीदरम्यान त्या नेमक्या कुठल्या ठिकाणी आहेत, यावर इंटरनेटच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येते. पूर्वी हे काम माणसांकरवी केले जायचे.

आधी लागला होता एक महिना

सन २००१ मध्ये संसदेवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर, भारताने ‘आॅपरेशन पराक्रम’ची तयारी हाती घेतली होती. त्या वेळी सीमेवर लष्करी फौजांची व सामग्रीची जमवाजमव करण्यास एक महिन्याचा कालावधी लागला होता. पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर भारतीय सैन्याच्या संख्याबळात वाढ करण्यात आली होती. मात्र, या हालचाली काहीशा संथगतीने झाल्यामुळे पाकिस्तानला भारताविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायासमोर कांगावा करण्यास पुरेसा वेळ मिळाला. यापासून धडा घेऊन, तेव्हापासून लष्कराने रेल्वेच्या सहकार्याने काही पावले टाकायला सुरुवात केली. सीमेवर लष्करी सामग्री व जवानांना वेगाने पोहोचविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर विचार सुरू झाला.

खास रेल्वेमार्ग रखडले
पाकिस्तान व चीनच्या सीमेवर खास लष्करासाठी १४ रेल्वेमार्ग बांधण्याच्या कामास निधीच्या कमतरतेमुळे अद्याप सुरुवात होऊ शकलेली नाही. इशान्य भारतासाठी तीन व जम्मू-काश्मीरसाठी एक असे लष्करासाठी चार रेल्वेमार्ग बांधण्याचे काम तातडीने हाती घेतले जावे, अशी मागणी लष्कराने केली आहे.

Web Title: military and war strategy can be done quickly, with the cooperation of the Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.