हवाई दलाचं मिग-27 विमान जैसलमेरमध्ये कोसळलं; पायलट सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 07:38 PM2019-02-12T19:38:22+5:302019-02-12T20:05:06+5:30

पॅराशूटच्या मदतीनं उडी घेतल्यानं वैमानिकाचे प्राण वाचले

mig 27 indian air force plane crashes in rajasthan jaisalmer pilot ejects | हवाई दलाचं मिग-27 विमान जैसलमेरमध्ये कोसळलं; पायलट सुरक्षित

हवाई दलाचं मिग-27 विमान जैसलमेरमध्ये कोसळलं; पायलट सुरक्षित

googlenewsNext

जयपूर: हवाई दलाच्या मिग-27 विमान राजस्थानच्या जैसलमेरमध्ये कोसळलं. संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हे विमान प्रशिक्षणासाठी वापरलं जात होतं. त्या दरम्यानच विमान कोसळल्याची माहिती मिळते आहे. सुदैवानं वैमानिक सुरक्षित आहे. विमान कोसळत असताना वैमानिकानं पॅराशूटच्या मदतीनं उडी घेतली. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. काही दिवसांपूर्वीच हवाई दलाचं मिराज 2000 विमान कोसळलं होतं. 

हवाई दलाचं मिग-27 हे लढाऊ विमान पोखरणमधल्या इटा गावात कोसळल्याची माहिती सुरक्षा दलातील अधिकाऱ्यानं दिली. वैमानिकानं विमान कोसळत असताना पॅराशूटच्या मदतीनं उडी घेतल्यानं त्याचा जीव वाचल्याचं संरक्षण विभागाचे प्रवक्ते सोम्बित घोष यांनी सांगितलं. 'दैनंदिन प्रशिक्षण सुरू असताना आज संध्याकाळी जैसलमेरमध्ये मिग-27 विमान कोसळलं. वैमानिक सुरक्षित आहे. मात्र या दुर्घटनेची चौकशी करुन त्यामागील नेमक्या कारणाचा शोध घेतला जाईल,' असं घोष म्हणाले. 




या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक किरन कांग यांनी दिली. दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि हवाई दलाचे संपर्कात होते. अपघातानंतर पोलीस कर्मचारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले, असंदेखील त्या म्हणाल्या. या महिन्याच्या सुरुवातीलाच मिराज 200 हे प्रशिक्षणासाठी विमान बंगळुरुत कोसळलं होतं. हिंदुस्तान ऍरोनॉटिक्स लिमिटेड विमानतळाजवळ 1 फेब्रुवारीला मिराज 2000 विमानाला अपघात झाला. यामध्ये दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला होता. विमान कोसळत असताना दोन्ही वैमानिकांनी बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र मोठा भडका उडाल्यानं दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. 

Web Title: mig 27 indian air force plane crashes in rajasthan jaisalmer pilot ejects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.