#MeToo : एम. जे. अकबर यांनी अनेकदा केले किस, अंतर्वस्त्रात यायचे समोर, महिला पत्रकाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 05:08 PM2018-10-16T17:08:43+5:302018-10-16T17:09:37+5:30

महिला सहकाऱ्यांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात अजून एका महिला पत्रकाराने आवाज उठवला आहे.

#MeToo: M. J. Akbar sexually harassed me - Tushita Patel | #MeToo : एम. जे. अकबर यांनी अनेकदा केले किस, अंतर्वस्त्रात यायचे समोर, महिला पत्रकाराचा आरोप

#MeToo : एम. जे. अकबर यांनी अनेकदा केले किस, अंतर्वस्त्रात यायचे समोर, महिला पत्रकाराचा आरोप

नवी दिल्ली -  महिला सहकाऱ्यांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात अजून एका महिला पत्रकाराने आवाज उठवला आहे. एम. जे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा किस केले. तसेच एकदातर ते चक्क अंतर्वस्त्रातच आपल्यासमोर आल्याचा आरोप महिला पत्रकार तुषिता पटेल यांनी केला आहे. स्क्रोल या संकेतस्थळावर लिहिलेल्या लेखामधून पटेल यांनी हा आरोप केला आहे. 

केंद्रीय मंत्री असलेल्या अकबर यांच्यावर आतापर्यंत 15 महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. तुषिता पटेल यांना आपल्या लेखात लिहिले आहे की, "1992 साली आपण ट्रेनी म्हणून काम करत होते. त्यावेळी अकबर हे पत्रकारिता सोडून राजकारणात उतरले होते. दरम्यान अकबर हे कोलकाता येथे आले असता मी एका सहकाऱ्याबरोबर त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर अकबर यांनी आपल्या घरी फोन करून बोलावण्यास सुरुवात केले. त्यांनी अनेकदा बोलावल्यावर भेटण्यास गेले असता त्यांनी चक्क अंतर्वस्त्रावरच असताना दरवाजा उघडला. त्यांचा तो अवतार पाहून मी घाबरले."

या लेखात तुषिता यांनी अजून एका प्रसंगाचा उल्लेख केला आहे. 1993 साली अकबर डेक्कन क्रॉनिकलचे एडिटर इन चिफ असताना तुषिता या हैदराबाद येथे सिनिअर सब एडिटर पदावर कार्यरत होत्या. त्यावेळी वृत्तपत्रातील एका पानावर चर्चा करण्यासाठी त्यांनी आपणास हॉटेलमध्ये बोलावले. तसेच तिथे आपल्याला अचानक पकडून वारंवार किस केले. असा आरोपही त्यांनी केला. लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमाणी यांच्यावर दाखल केलेल्या अब्रुनुसानीच्या दाव्यानंतर तुषिता पटेल यांनी हे आरोप केले आहेत. तसेच न्यायालयातही महिला त्यांचा सामना करतील असे तुषिता यांनी सांगितले. 

दरम्यान, परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमानी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. याप्रकरणी दिल्लीतील पटियाला कोर्टात 18 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. एम. जे. अकबर यांनी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात 15 ऑक्टोबरला अब्रुनुकसानी खटला दाखल केला होता. करण्यात आलेल्या आरोपांप्रकरणी अकबर यांनी आपली बाजू मांडली असून, त्यांनी संबंधितांवर दावाही दाखल केला आहे. याबाबत अकबर यांच्या वकिलांनी सांगितले की, अकबर यांच्या बाजूनं लढण्यास 97 वकिलांची फौज तयार आहे.  

''लैंगिक शोषणाचे सारे आरोप पूर्णत: खोटे आहेत. खोट्या आरोपांना पाय नसतात मात्र त्याचे विष हमखास बाधते. बेजबाबदार आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे'', असा इशारा देत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे.अकबर यांनी या प्रकरणात अखेर आपले हात झटकले.

Web Title: #MeToo: M. J. Akbar sexually harassed me - Tushita Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.