नवी दिल्ली - भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा स्वतःच्याच पक्षाला घरचा अहेर दिला आहे.  देशातील काही लोक जीएसटीच्या निर्णयाला पाठिंबा देतात, काहीजण देत नाहीत. नोटाबंदीलाही काहींचा पाठिंबा आहे तर काहीजणांचा नाही. मात्र, याचा अर्थ असा होत नाही की, सरकारी धोरणांवर टीका करणारे लोक देशद्रोही आहेत, अशा शब्दांत शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एका भाजपाला सुनावले आहे. 

'मर्सल' या तामिळी सिनेमावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. या सिनेमातील काही संवाद वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), डिजिटल इंडियावर नकारात्मक टिप्पणी करणारे आहेत. यावर भाजपानं आक्षेप नोंदवला आहे. यासंदर्भात बोलतानाच शत्रुघ्न सिन्हा यांनी संबंधित विधान केले आहे. 


राहुल गांधींनी टि्वट करुन मोदींना सुनावले खडेबोल

'मर्सल' या तामिळ चित्रपटावरुन सुरु झालेल्या वादात उडी घेत  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. मर्सल चित्रपटातून जीएसटी कररचना आणि डिजिटल इंडिया या मोदी सरकारच्या दोन महत्वाच्या निर्णयांवर टीका करण्यात आली आहे. भाजपाने या दृश्यांवर आक्षेप घेत ही सीन्स चित्रपटातून हटवण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी टि्वट करुन या चित्रपटाला समर्थन दिले आहे. 

मोदी मर्सल सिनेमा तामिळ संस्कृती आणि भाषेची अभिव्यक्ती आहे. मर्सलमध्ये हस्तक्षेप करुन तुम्ही तामिळ अभिमानावर बंदी आणू नका असे टि्वट राहुल यांनी केले आहे. प्रसिद्ध तामिळ अभिनेता विजयची मुख्य भूमिका असलेल्या मर्सल सिनेमात जीएसटीचा उल्लेख आहे. भाजपाला सिनेमातील हे दृश्य अजिबात आवडले नसून, त्यांनी आक्षेप घेत सीन कट करण्याची मागणी केली आहे. 

मी हा चित्रपट बघितलेला नाही. पण ज्या लोकांनी हा चित्रपट बघितला  त्यांना जीएसटी आणि डिजिटल पेमेंटबद्दलच्या चुकीच्या माहितीमुळे अपमानित झाल्यासारखे वाटते. जीएसटीचा धोरणात्मक निर्णय होता. केंद्र सरकारने भरपूर अभ्यास करुनच हा निर्णय घेतला. सेलिब्रिटीनी अशी चुकीची विधाने करु नयेत असे तामिलीसाई सौदराजन म्हणाल्या. त्या तामिळनाडू भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत.