In Meghalaya, four legislators, including a Congress MLA, are preparing for the BJP |  मेघालयात काँग्रेसच्या एका आमदारासह चार आमदार भाजपा प्रवेशाच्या तयारीमध्ये

ठळक मुद्देया आमदारांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सांबोर शुल्लाई आणि जस्टीन दखर, रॉबिनस सिंगकोन या अपक्षांचा समावेश आहे.

शिलॉंग- मेघालयात काँग्रेसच्या अलेक्झांडर हेक यांच्यासह चार आमदार विधानसभेचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. यावर्षी मार्च महिन्यामध्ये मेघालय विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. या आमदारांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सांबोर शुल्लाई आणि जस्टीन दखर, रॉबिनस सिंगकोन या अपक्षांचा समावेश आहे.

आम्ही आज मंगळवारी मेघालय विधानसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश करणार आहोत अशी माहिती हेक यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. त्यानंतर होणाऱ्या सभेसाठी केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फोन्स उपस्थित राहाणार आहेत. अल्फोन्स भाजपाचे मेघालय राज्यप्रभारी आहेत. अल्फोन्स यांच्याबरोबर नॉर्थ इस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सचे समन्वयक हेमंत विश्वशर्मा तसेच इतर पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत.

केंद्र आणि इतर राज्यामधील भाजपा व रालोआ सरकारचा उत्तम कारभार पाहून हे चार आमदार भाजपामध्ये येत असल्याचे पक्षाचे मेघालय प्रदेशाध्यक्ष शिबुन लिंगडोह यांनी सांगितले. अलेक्झांडर हेक मुकुल संगमा यांच्या कॅबिनेटमध्ये आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री होते. संगमा यांनी गेल्या वर्षी त्यांना कॅबिनेटमधून काढून टाकले होते. अलेक्झांडर कॉंग्रेसमध्ये जाण्यापुर्वी भाजपातर्फेच विधानसभेत निवडून जायचे. 1998, 2003, 2008 असे तीन वेळा ते भाजपाच्या तिकिटावर ते विधानसभेत निवडून गेले होते. 2009 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2013 साली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत प्रवेश केला.