मायावती जाणार १५ कोटींच्या बंगल्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:38 AM2018-05-22T00:38:10+5:302018-05-22T00:38:10+5:30

सरकारी बंगला सोडणार : सफाई व रंगरंगोटीची लगबग; आकाराने दुप्पट

Mayawati to get 15 crores bungalow! | मायावती जाणार १५ कोटींच्या बंगल्यात!

मायावती जाणार १५ कोटींच्या बंगल्यात!

Next


लखनऊ : माजी मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेश सरकारने दिलेला सरकारी बंगला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सोडावा लागणार असल्याने बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती त्याहून दुप्पट आकाराच्या स्वमालकीच्या बंगल्यात मुक्काम हलविण्याची तयारी करत आहेत.
मॉल अ‍ॅव्हेन्यूवरील ९ क्रमांकाचा सरकारी बंगला सोडून मायावती त्याच रस्त्यावर जवळच असलेल्या १३ क्रमांकाच्या बंगल्यात राहायला जाणार आहेत. या नव्या बंगल्याची सफाई व रंगरंगोटी करण्याची नोकरांची लगबग सुरु आहे. स्वत: मायावती यांनी रविवारी या बंगल्याला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. सामानसुमान हलविण्याचे काम सुरू असले तरी मुक्काम नेमका केव्हा हलविणार हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने मायावती यांना सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस दिली तेव्हापासून त्यांनी आपल्या स्वत:च्या घरात स्थलांतर करण्याची तयारी सुरु केली. स्वत:चा बंगला असूनही मायावती यांनी सरकारी बंगला का सोडला नाही, हा प्रश्न आहे.

५३ हजार चौ. फूटांचा बंगला
मायावती यांना सरकारने दिलेला बंगला २३ हजार चौ. फूट आकाराचा होता. मायावतींचा स्वत:चा बंगला ५३ हजार चौ. फूट आकाराचा आहे. मोकळ््या जागेसह बंगल्याचे एकूण आवार ७१ हजार चौ. फुटांचे आहे.

मायावती यांनी सत्तेत असताना ज्या लाल दगडाची स्मारके लखनऊ व अन्य शहरांमध्ये बांधली, त्याच ‘रेड सँड स्टोन’ने त्यांचा हा बंगला बांधला आहे. मध्यभागी असलेला प्रचंड आकाराचा घुमट हे या बंगल्याचे नजरेत भरणारे वैशिषट्य आहे. युपीत २००७ मध्ये पूर्ण बहुमताने सत्तेवर आल्यानंतर तीनच वर्षांत नोव्हेंबर २०१० मध्ये हा बंगला १५ कोटींना खरेदी केला, अशी माहिती मायावती यांनीच दिली होती.

मुलायम, राजनाथही तयारीत
सपाचे नेते मुलायम सिंग यादव व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनाही सरकारी बंगले सोडावे लागणार आहेत. त्यांना अनुक्रमे ५, विक्रमादित्य मार्ग व ४ कालिदास मार्ग हे बंगले दिले होते. मुलायम सिंग यांनी नव्या घराचा सोध सुरु केला असून, राजनाथ सिंग गोमती नगरमधील स्वत:च्या बंगल्यात जाणार आहेत.

Web Title: Mayawati to get 15 crores bungalow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.