जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरला धक्का! सुरक्षा पथकांनी पुतण्याचा केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 11:49 AM2017-11-07T11:49:39+5:302017-11-07T12:07:20+5:30

भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणणा-या जैश-ए-मोहम्मदला मंगळवारी मोठा धक्का बसला.

Masood Azhar’s nephew killed in Pulwama encounter | जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरला धक्का! सुरक्षा पथकांनी पुतण्याचा केला खात्मा

जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरला धक्का! सुरक्षा पथकांनी पुतण्याचा केला खात्मा

Next
ठळक मुद्देयावर्षात दक्षिण काश्मीरमध्ये आतापर्यंत 72 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

श्रीनगर - भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणणा-या जैश-ए-मोहम्मदला मंगळवारी मोठा धक्का बसला. जैशचा प्रमुख मसूद अजहरचा पुतण्या तल्हा राशिद सोमवारी काश्मीरमध्ये सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला. मंगळवारी सकाळी जैशच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अग्लर कंदी गावात लष्कराने केलेल्या कारवाईमध्ये तीन दहशतवादी ठार झाले. त्यामध्ये तल्हा राशिदही होता. 

गावातील दोन घरांमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने त्या परिसराला वेढा घातला व कारवाई सुरु केली. या कारवाई दरम्यान एक जवानही शहीद झाला. 44 राष्ट्रीय रायफल्स आणि 182 केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या दहशतवाद्यांकडून अमेरिकन बनावटीची शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहेत.  यावर्षात दक्षिण काश्मीरमध्ये आतापर्यंत 72 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यामध्ये दहा जैशचे दहशतवादी आहेत. दशकभरात प्रथमच इतक्य मोठया संख्येने दहशतवाद्यांना संपवण्यात आले आहे. 



 



 

मसूद अजहरच्या मदतीला पुन्हा धावला चीन
पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार व जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनकडून पुन्हा एकदा खोडा घालण्यात आला. चीनने पुन्हा एकदा सर्वानुमत नसल्याचे कारण पुढे करत हा प्रस्ताव फेटाळून लावला.

गेल्यावर्षीही चीनने संयुक्त राष्ट्रात ‘नकाराधिकाराचा’ वापर करत भारताच्या प्रयत्नांना खीळ घातली होती. अमेरिका, फ्रान्स व इंग्लंड यांनी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्तपणे प्रस्ताव मांडला होता. गेल्यावर्षी मार्च महिन्यात १५ देशांचा समावेश असलेल्या संयुक्त राष्टाच्या समितीमध्ये हा ठराव मांडण्यात आला होता. तेव्हा चीन वगळता उर्वरित १४ देशांनी भारताच्या प्रस्तावावर सहमती दर्शविली होती. हा प्रस्ताव मान्य झाला असता तर मसूद अजहरची संपत्ती गोठवली गेली असती आणि त्याच्यावर प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली असती. 

गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक कारण पुढे करत चीनने हा प्रस्ताव अडवून ठेवला होता. मात्र, आज ती मुदत संपुष्टात आली. ऑगस्ट महिन्यात चीनने या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून घेतली होती. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत चीनकडून वारंवार मसूद अजहरच्या वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. 

Web Title: Masood Azhar’s nephew killed in Pulwama encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.