गल्ली ते दिल्ली... बघा, मोदी सरकारने चार वर्षांत किती ठिकाणांची नावं बदलली!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 06:01 PM2018-08-12T18:01:46+5:302018-08-12T18:08:45+5:30

गेल्या चार वर्षांत अनेक शहरं आणि महत्त्वपूर्ण ठिकाणांची नावं बदलण्यात आली आहेत. काही नावांमधील बदल विरोधकांना खटकला आणि त्यावरून वादही झाला.

many places in differnt states have got new names in last four years of Narendra Modi government | गल्ली ते दिल्ली... बघा, मोदी सरकारने चार वर्षांत किती ठिकाणांची नावं बदलली!

गल्ली ते दिल्ली... बघा, मोदी सरकारने चार वर्षांत किती ठिकाणांची नावं बदलली!

नवी दिल्लीः केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या चार वर्षांत अनेक शहरं आणि महत्त्वपूर्ण ठिकाणांची नावं बदलण्यात आली आहेत. काही नावांमधील बदल विरोधकांना खटकला आणि त्यावरून वादही झाला. परंतु, येत्या काळातही ही नामांतराची मालिका सुरूच राहण्याची शक्यता आहे. कारण 27 ठिकाणांची नावं बदलण्याबाबतचे प्रस्ताव केंद्रीय गृहखात्याकडे विविध राज्यांमधून आलेत. त्यात सर्वाधिक प्रस्ताव राजस्थान आणि हरियाणातील आहेत.

या निमित्तानेच एक नजर टाकू या, गेल्या चार वर्षांत नवं नाव मिळालेल्या ठिकाणांवर आणि त्यामागील कारणांवर... 

नोव्हेंबर 2014

कर्नाटकातील 13 शहरांची नावं बदलली, त्यात बेंगलोरचं नाव बदलून बेंगळुरू करण्यात आलं. त्यासोबतच मैसूरचं मैसुरू आणि मेंगलोरचं मेंगळुरू करण्यात आलं. कन्नड भाषेतील शब्दांचं योग्य उच्चारण व्हावं, या उद्देशानं हे बदल करण्यात आले. 

ऑगस्ट 2015

राजधानी दिल्लीतील औरंगजेब रोडला माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्यात आलं. भाजपाचे खासदार महेश गिरी यांनी याबाबतचा प्रस्ताव दिला होता. 

ऑक्टोबर 2015

राजहमुंद्री हे नाव बदलून राजामहेंद्रवर्मन करण्यात आलं. 11व्या शतकातील राजे राजामहेंद्रवर्मन यांचा सन्मान करण्याच्या हेतूने हा बदल करण्यात आला. 

एप्रिल 2016

गुडगाव झालं गुरुग्राम. गुरू द्रोणाचार्य यांच्या नावावरून हा बदल झाला होता. त्यासोबतच मेवात हे नाव बदलून नूंह करण्यात आलं होतं. 

मे 2016

बेंगळुरू शहर रेल्वे स्टेशनला 19व्या शतकातील स्वातंत्र्यसैनिक क्रांतीवीर संगोल्ली रायन्ना यांचं नाव देण्यात आलं. 

सप्टेंबर 2016

पंतप्रधानांचं निवासस्थान म्हणून भारतीय राजकारणात प्रसिद्ध असलेल्या 7 रेसकोर्सचं नामकरण लोक कल्याण मार्ग करण्यात आलं.

जानेवारी 2017

हरियाणात गांडा नावाचं गाव होतं. त्यावरून तिथल्या ग्रामस्थांची खिल्ली उडवली जायची. ते बदलून अजितनगर करण्यात आलं. 

जुलै 2017

ओडिशातील क्षेपणास्त्र परीक्षण केंद्राचं नामकरण मिसाईल मॅन कलाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एपीजे अब्दुल कलाम टापू असं करण्यात आलं. 

सप्टेंबर 2017

गुजरातमधील बंदराला जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ यांचं नाव देण्यात आलं. 

फेब्रुवारी 2018 

राजस्थानमधील चोर बसई या गावाच्या नावातून चोर हा शब्द काढून टाकण्यात आला. तर, बिहारमधील नचनिया हे नाव बदलून काशीपूर करण्यात आलं. 

जुलै 2018

मुंबई उपनगरीय रेल्वेवरी एल्फिन्स्टन रोड स्टेशनचं नाव प्रभादेवी केलं गेलं. 

जुलै 2018

पश्चिम बंगाल विधानसभेनं राज्याचं नाव बांग्ला असं करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. 

ऑगस्ट 2018

मुगलसराय जंक्शनचं नाव बदलून पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असं करण्यात आलं. 1860 मध्ये स्थापन झालेल हे स्टेशन देशातील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक आहे. या नामकरणावरून सत्ताधारी आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. 

दरम्यान, अहमदाबादचं नाव बदलून कामावती करण्याचा प्रस्ताव गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिला आहे. त्याशिवाय, अलाहाबादचं नाव प्रयागराज करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आग्रही आहेत.

 

Web Title: many places in differnt states have got new names in last four years of Narendra Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.