पणजी : मी लहानपणी हायस्कुलमध्ये जात होतो, तेव्हा आणि नंतरही गणित हा माझ्या आवडीचा विषय होता. मला गणितात शंभरापैकी ९९ गुण मिळत होते; मात्र मी कधीच गणिताचा अभ्यास करत नसे. मला गणिते सहज सुटत होती, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
पत्रकाराच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना विविध प्रश्न विचारले व पर्रीकर यांनीही दिलखुलासउत्तरे देत हास्याचे कारंजे फुलविले. ते म्हणाले, मी अकरावीत असताना माझ्या शिक्षकांनाच काही गणिते घातली. ती त्यांना सोडविता आली नव्हती. शाळेत असताना मला अभ्यास करत बसावे लागले नाही. मी युनिव्हर्र्सिटीमध्ये गोव्यात दुसरा आलो होतो. त्यावेळी माझे गुण ७१ टक्के होते. आता बहुतेक विद्यार्थी दहावीला वगैरे ९९ टक्के गुण प्राप्त करतात. आताची सगळीच मुले हुशार आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. आम्ही शिक्षण सोपे केले आहे. त्यामुळे हल्ली कोणीही ९९ टक्के गुण प्राप्त करतात, असे पर्रीकर हसत-हसत म्हणाले!
मर्सिडिजमधून फिरण्याची इच्छा!
तुमच्या अशा कोणत्या इच्छा होत्या, ज्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत, असे मुलांनी विचारले असता पर्रीकर म्हणाले की, लहानपणी मला वाटायचे की माझ्याकडे मर्सिडिज गाडी असायला हवी.
त्यामुळे खूप शिकावे व नोकरी किंवा व्यवसाय करून खूप पैसा मिळवावा व प्रथम मर्र्सिडीज खरेदी करावी, असे ठरविले होते.
ती इच्छा यापुढे पूर्ण होईलही; पण सध्या मी आर्थिकदृष्ट्या योग्य स्थितीत असूनदेखील
मला इच्छा पूर्ण करता येत नाही.
कारण मी राजकारणात आहे. राजकीय नेत्यांनी मर्सिडिज कारमधून फिरणे हे योग्य ठरणार नाही.
राजकारण्यांनी ७०व्या वर्षी निवृत्त व्हावे!-
राजकारण्यांनी कधी निवृत्त व्हावे असे तुम्हाला वाटते, या प्रश्नावर पर्रीकर म्हणाले की, कुठल्याही राजकारण्याने त्याच्या वयाच्या ६५व्या वर्षी स्वत:च्या आरोग्याचा व शारीरिक क्षमतेचा एकदा आढावा घ्यावा.
वयाच्या ६५व्या वर्षी निवृत्त होता आले नाही, तर ७०व्या वर्षी तरी निश्चितच आरोग्याचा आढावा घेऊन निवृत्त व्हावे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.