मणिशंकर अय्यर यांचं 'नीच' वक्तव्य काँग्रेसला भोवणार ? गुजरात निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 12:13 PM2017-12-08T12:13:41+5:302017-12-08T12:21:37+5:30

कपिल सिब्बल यांनी अयोध्या प्रकरणी झालेल्या सुनावणीत केलेल्या युक्तिवादावरुन आधीच भाजपा प्रचारादरम्यान काँग्रेसविरोधात रान उठवत असताना, आता मणिशंकर अय्यर यांनी भाजपाच्या हाती आयतं कोलीत दिलं आहे.

Mani Shankar Aiyar's remarks on 'negative' Congress? The possibility of a blow to the Gujarat elections | मणिशंकर अय्यर यांचं 'नीच' वक्तव्य काँग्रेसला भोवणार ? गुजरात निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता

मणिशंकर अय्यर यांचं 'नीच' वक्तव्य काँग्रेसला भोवणार ? गुजरात निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता

Next
ठळक मुद्देमणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे कोणतंही नुकसान झालेलं नसून, डॅमेज कंट्रोल झाल्याचा दावा काँग्रेस करत आहेभाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका पाहता काँग्रेससाठी हे प्रकरण सोपं जाणार नसल्याचं दिसत आहेअरुण जेटलींनीही भाजपा गुजरातमध्ये काँग्रेसला घेरणार असल्याचं स्पष्ट केलं आहे

नवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना 'नीच' असा उल्लेख केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई होण्याआधी मणिशंकर अय्यर यांनी माफी मागत आपली हिंदी खराब असून, कोणाला त्याच्यावर आक्षेप असेल तर माफी मागतो असं म्हटलं होतं. मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे कोणतंही नुकसान झालेलं नसून, वेळेत कारवाई केल्याने डॅमेज कंट्रोल झाल्याचा दावा काँग्रेस करत आहे. मात्र भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका पाहता काँग्रेससाठी हे प्रकरण सोपं जाणार नसल्याचं दिसत आहे. कपिल सिब्बल यांनी अयोध्या प्रकरणी झालेल्या सुनावणीत केलेल्या युक्तिवादावरुन आधीच भाजपा प्रचारादरम्यान काँग्रेसविरोधात रान उठवत असताना, आता मणिशंकर अय्यर यांनी भाजपाच्या हाती आयतं कोलीत दिलं आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तर मणिशंकर अय्यर यांच्यावरील निलंबनाची कारवाई काँग्रेसच्या रणनीतीचा भाग असून, या वक्तव्यावरुन भाजपा गुजरातमध्ये काँग्रेसला घेरणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वक्तव्याला जातीशी जोडून मतदारांना भाविनक आवाहन केल्यानंतर आता भाजपाचे इतरही नेते गुजरात निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा वापरु शकतात. पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला असून, शनिवारी मतदान होणार आहे. पण दुस-या टप्प्यातील प्रचार जोर धरत असून, भाजपा प्रचारादरम्यान या वक्तव्याचा वापर करत काँग्रेसवर टीका करण्याची संधी सोडण्याच्या अजिबात मूडमध्ये नाही. प्रचारादरम्या हा मुद्दा वापरत भाजपा वादळ उठवण्याच्या तयारीत आहे. 

गुजरातमधील दुस-या टप्प्यात प्रचार करण्यासाठी पोहोचलेल्या योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्यावरुन तरी भाजपाला ही आग इतक्या लवकर शांत व्हावी असं वाटत नसल्याचं स्पष्ट होत आहे. एका मुलाखतीत योगी आदित्यनाथ बोललेत की, 'मणिशंकर अय्यर यांनी संपुर्ण देशाचा अपमान केला आहे. यामधून काँग्रेसचे संस्कार दिसतात. हे वक्तव्य काँग्रेसच्या परंपरेचं दर्शन घडवतंय'. योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींच्या राम मंदिर भेटीवर टीका करताना, 'एकीकडे तुम्ही राम मंदिराची सुनावणी पुढे ढकलण्यासाठी आग्रह करता आणि दुसरीकडे मंदिराला भेट देतात. राम आणि कृष्णावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असाल, तर मग मंदिराला भेट देणं ढोंग आहे'.

आधीही काँग्रेसला बसला आहे वादग्रस्त वक्तव्याचा फटका 
2016 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी एका प्रचारसभेत वक्तव्य केलं होतं की, सर्जिंकल स्ट्राइक आपल्या जवानांनी केला होता. त्यांच्या रक्तामागे तुम्ही (नरेंद्र मोदी) आहात. तुम्ही त्यांची दलाली करत आहात. दुसरीकडे, 2014 मध्ये सोनिया गांधींनी कर्नाटकमधील प्रचारसभेत नरेंद्र मोदींवर 'विषाची शेती' करण्याचा आरोप केला होता. 2007 मध्येही सोनिया गांधींनी असं एक वक्तव्य केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी मोदींना 'मौत का सौदागर' असं म्हटलं होतं. यामुळे मुस्लमांची मतं आपल्याला मिळतील असा काँग्रेसला विश्वास होता. मात्र ध्रुवीकरणाचा फायदा भाजपाला मिळाला होता. 

मणिशंकर अय्यर यांचं मोदींना 'चहावाला' म्हणणं पडलं होत महाग
मणिशंकर अय्यर यांनी 2014 च्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या बैठकीत वक्तव्य केलं होतं की, 'मी तुम्हाला आश्वासन देतो की, नरेंद्र मोदींना देशाचा पंतप्रधान होऊ देणार नाही. पण जर त्यांना चहा विकायचा असेल तर त्यांना जागा शोधून देण्यासाठी मदत करेन'. मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचा पुरेपूर फायदा भाजपाने करुन घेतला होता, ज्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला.

अमर सिंह म्हणतात, देशातील अनेक नेते 'मणी पीडित'
इतकंच नाही तर समाजवादी पक्षातून हाकलपट्टी करण्यात आलेले राज्यसभा खासदार अमर सिंह यांनीदेखील मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. 'या देशातील अनेक नेते मणी पीडित आहेत. यामध्ये उमा भारती, जयललिता यांच्यासहित अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. मी स्वत: मणी पीडित आहे'. आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांनीदेखील मणिशंकर अय्यर यांना चांगलंच झापलं आहे. 'या देशात राजकीय मर्यादा, भाषा आणि व्याकरणाची फक्त एकाच व्यक्तीने विल्हेवाट लावली आहे', असं ट्विट लालूंनी केलं. 
 

Web Title: Mani Shankar Aiyar's remarks on 'negative' Congress? The possibility of a blow to the Gujarat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.