Mani Shankar Aiyar's mental balance worsened, Lalu criticized Congress leader | मणिशंकर अय्यर यांचं मानसिक संतुलन बिघडलं, लालूंची काँग्रेस नेत्यावर टीका

बिहार- आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी काँग्रेस  नेते मणिशंकर अय्यर यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसच्या समर्थनार्थ नेहमीच बोलणा-या लालूंनी काँग्रेस नेत्यालाच लक्ष्य केल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अय्यर यांनी मोदींना नीच असं संबोधल्यानंतर लालूंनी त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं सांगितलं आहे. पाटण्यात पत्रकारांनी छेडले असता लालूप्रसाद यादव यांनी हे विधान केलं आहे.

परंतु मणिशंकर अय्यर यांच्या या विधानाला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचंही लालूंनी सांगितलं आहे. मोदींनी उचकवल्यामुळेच मणिशंकर अय्यर यांनी हा शब्द उच्चारल्याचंही लालू म्हणाले आहेत. या देशात राजनैतिक मर्यादा, भाषा व व्याकरण फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीच्या नजरेतून पाहिलं जातंय, असं म्हणत लालूंनी मोदींवरही निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागितली आहे. नरेंद्र मोदी एकदम नीच आणि असभ्य माणूस असल्याची टीका मणिशंकर अय्यर यांनी केली होती. आपल्या या वक्तव्यावरून माघार घेत त्यांना माफी मागावी लागली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही त्यांच्या भाषेचं असमर्थन करत माफी मागण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. 'नीच म्हणजे खालच्या स्तराचा असं मला म्हणायचं होतं. हिंदी माझी मातृभाषा नसल्याने मी हिंदी बोलताना इंग्लिशचाच विचार करून बोलतो. जर माझ्या वक्तव्याचा काही दुसरा अर्थ निघाला असेल तर मी माफी मागतो', असं मणिशंकर अय्यर बोलले आहेत. 

'बाबासाहेब आंबेडकरांच्या सेंटरचं उद्घाटन करताना नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर टीका करण्याची काय गरज होती ? दरदिवशी नरेंद्र मोदी आमच्या नेत्यांविरोधात असभ्य भाषा वापरत आहेत. मी फ्रिलान्स काँग्रेस नेता आहे. माझ्याकडे कोणतंही पद नाही. त्यामुळे मी मोदींना त्यांच्या भाषेत उत्तर देऊ शकतो', असं मणिशंकर अय्यर म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'नीच म्हणजे खालच्या स्तराचा असं मला म्हणायचं होतं. हिंदी माझी मातृभाषा नसल्याने मी हिंदी बोलताना इंग्लिशचाच विचार करून बोलतो. जर माझ्या वक्तव्याचा काही दुसरा अर्थ निघाला असेल तर मी माफी मागतो'.