मध्य प्रदेश, राजस्थानात मतदानाआधीच काँग्रेस नेत्यांमध्ये खुर्चीसाठी खेचाखेची 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 01:58 PM2018-11-15T13:58:00+5:302018-11-15T13:58:28+5:30

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वीच काँग्रेसच्या ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांमध्ये खुर्चीसाठी खेचाखेची सुरू झाली आहे.

Madhya Pradesh, Rajasthan, before the polling, Congress leaders will be fielded for the chair | मध्य प्रदेश, राजस्थानात मतदानाआधीच काँग्रेस नेत्यांमध्ये खुर्चीसाठी खेचाखेची 

मध्य प्रदेश, राजस्थानात मतदानाआधीच काँग्रेस नेत्यांमध्ये खुर्चीसाठी खेचाखेची 

Next

जयपूर - मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून सत्तेत पुनरागमन करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. मात्र दोन्ही राज्यांमध्ये प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वीच काँग्रेसच्या ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांमध्ये खुर्चीसाठी खेचाखेची सुरू झाली आहे. एकीकडे मध्य प्रदेशात काँग्रेस पक्ष दिग्विजय सिंह आणि कमलनाथ या ज्येष्ठ नेत्यांच्या गटांमध्ये विभागला गेला असून, युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे सत्तास्पर्धेत पिछाडीवर पडले आहेत. तर राजस्थानमध्ये ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर करून युवा सचिन पायलट यांच्यासोबत आपणही सत्तास्पर्धेत सामील असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानापूर्वी काँग्रेससमोरील अडचणी काही प्रमाणात वाढण्याची चिन्हे आहेत.

 मध्य प्रदेशमध्ये काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असले तरी पक्षातील विविध गटांमधील मतभेद अनेकदा उघड झाले आहेत. काही दिवसांपूर्वी दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात राहुल गांधी यांच्यासमोरच जोरदार खडाजंगी झाली होती. त्यानंतरही राज्यात पक्ष कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे, आणि दिग्विजय सिंह अशा तीन नेत्यांच्या गटात विभागला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दिग्विजय सिंह यांनी आपण मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नसल्याचे सांगत पक्षाची चिंता काहीशी दूर केली असली तरी राज्यातील विविध भागात आपल्या गटाच्या 75 उमेदवारांना तिकीट मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले आहेत.  

तर कमलनाथ आणि शिंदे यांच्या गटातील प्रत्येकी 45-45 उमेदवारांना तिकीट मिळाले आहे. तर अजय सिंह आणि सुरेश पचौरी यांच्या गटांना 10 ते 15 ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे. मात्र दिग्विजय सिंह यांचे निकटवर्तीय असलेल्या सत्यव्रत चतुर्वेदी आपल्या मुलाला उमेदवारी मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे राज्यात दिग्विजय आणि कमलनाथ या अनुभवी मंडळींसमोर ज्योतिरादित्य शिंदे यांना संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.  

दुसरीकडे राजस्थानमध्ये काँग्रेस भाजपाकडून सत्ता खेचून घेणार अशी परिस्थिती आहे. त्यामुळे इथेही मुख्यमंत्रिपदासाठी मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी सुरू आहे. राजस्थानमध्ये ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी ते आणि सचिन पायलट विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्याने चर्चांना उत आला आहे.  राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे. मात्र दोन्ही नेत्यांनी आतापर्यंत याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. मात्र त्यांच्या समर्थकांकडून यासंदर्भात दावे केले जात आहे.  तसेच गहलोत यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने मुख्यमंत्रिपदासाठी सचिन पायलट यांच्यासमोर आव्हान उभे राहिल्याचे मानले जात आहे. 

दरम्यान, मध्य प्रदेशात दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांच्या सक्रियतेमुळे पक्षातील अंतर्गत समीकरणे भक्कमली आहेत. त्यांची उपस्थिती विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची ठरेल, असेही मानले जात आहे. तसेच राजस्थानमध्ये अशोक गहलोत मैदानात नसल्याने पक्षाला नुकसान होऊ शकते, अशी माहिती काँग्रेस नेतृत्वापर्यंत पोहोचवण्यात आली आहे.  

Web Title: Madhya Pradesh, Rajasthan, before the polling, Congress leaders will be fielded for the chair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.