प्रियंकाला देशासाठी अर्पण करतो, रॉबर्ट वाड्रांच्या भावुक पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 05:31 PM2019-02-11T17:31:52+5:302019-02-11T18:01:22+5:30

लखनऊमध्ये प्रियंका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा रोड शो सुरू आहे.

lucknow robert vadra facebook post priyanka gandhi to the people of india | प्रियंकाला देशासाठी अर्पण करतो, रॉबर्ट वाड्रांच्या भावुक पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

प्रियंकाला देशासाठी अर्पण करतो, रॉबर्ट वाड्रांच्या भावुक पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

Next

नवी दिल्ली- लखनऊमध्ये प्रियंका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा रोड शो सुरू आहे. याचदरम्यान प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुकवर एक भावुक पोस्ट लिहिली आहे. रॉबर्ट वाड्रांच्या या भावुक पोस्टमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. रॉबर्ट वाड्रा फेसबुक पोस्टमध्ये लिहितात, तू माझी खरी मैत्री आहे. योग्य सहचारिणी आणि माझ्या मुलांसाठी चांगली आई असल्याचं तू सिद्ध केलं आहेस. परंतु आजची राजकीय परिस्थिती दुर्भाग्यपूर्ण आहे. मला माहीत आहे की, तू तुझी जबाबदारी योग्य पद्धतीनं निभावशील.

रॉबर्ट वाड्रा पुढे लिहितात, मी प्रियंकाला देशासाठी अर्पण करतो. भारतीय जनतेनं त्यांची काळजी घ्यावी, अशी पोस्ट रॉबर्ट वाड्रांनी टाकल्यामुळे सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय ठरत आहे. काँग्रेसच्या महासचिवपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर आज प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. प्रियंका राजकारणात सक्रिय होत असल्याच्या निमित्तानं काँग्रेसनं राज्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. उत्तर प्रदेशात गलितगात्र अवस्थेत असलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देण्याची कामगिरी त्यांना पार पाडावी लागणार आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी प्रियंका यांच्या खांद्यावर आहे. समाजवादी पार्टी-बहुजन समाज पार्टीच्या महाआघाडीचा आणि सत्ताधारी भाजपाचा मुकाबला करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.


'बदलाव की आंधी, प्रियंका गांधी' अशा घोषणा रोड शो दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. याशिवाय लखनऊमध्ये प्रियंका आणि राहुल गांधींचे पोस्टरदेखील लावण्यात आले. प्रियंका यांच्या रोड शोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह खासदार ज्योतिरादित्य सिंधियादेखील उपस्थित आहेत. सिंधिया यांच्याकडे पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. या रोड शो दरम्यान राहुल यांनी पुन्हा एकदा राफेल विमान कराराचा मुद्दा उपस्थित केला. राहुल आणि प्रियंका बसमधून रोड शो करत आहेत. त्यावेळी त्यांच्या हातात राफेल विमानाचं कट आऊट पाहायला मिळालं. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर है अशी घोषणाबाजी केली. याशिवाय काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हातातही राफेलचं कटआऊट पाहायला मिळालं.

Web Title: lucknow robert vadra facebook post priyanka gandhi to the people of india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.