ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 20 - प्रेमी युगूलाला नग्न करुन मारहाण करत गावभर धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकमेकांशी असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध म्हणून त्यांना ही शिक्षा देण्यात आली. पीडित मुलीला काठीने मारहाण करत तिच्यावर लैंगिक अत्याचारही करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 18 जणांना अटक केली आहे. यामध्ये मुलगा आणि मुलीच्या वडिलांचाही समावेश आहे. राजस्थानमधील बंसवाडा जिल्ह्याच्या शंभूपुरा गावात ही धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 
 
वरिष्ठ पोलीस अधिकारी आनंद शर्मा यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कारवाईचे आदेश दिले. गावातील कोणीही यासंबंधी तक्रार केली नव्हती. धक्कादायक म्हणजे प्रेमी युगूलाकडून या घटनेची पोलिसांत तक्रार करणार नाही असं लेखी लिहून घेतलं होतं. 
 
अटक करण्यात आलेल्या आरोपींवर हत्येचा प्रयत्न, बलात्कार आणि बेकायदेशीर कैदेत ठेवल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. "आम्ही पीडित तरुणाला पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याने घटनेची माहिती दिली. पीडित मुलीचं जबरदस्ती दुसरीकडे लग्न लावून देण्यात आलं होतं. लिमथान गावात तिला जबरदस्ती कैदेत ठेवण्यात आलं होतं. तिची सुटका करण्यात आली आहे", अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
प्रेमी युगूल नात्याने चुलत भाऊ - बहिण लागत होते. आदिवासी समाजात वाढलेल्या या दोघांच्या प्रेमाला विरोध होत असल्याने 22 मार्चला त्यांनी गावातून पळ काढला. गावक-यांनी याची पोलिसांत काही तक्रार न करता स्वत:च शोध घेतला आणि परत गावी आणले. गावी आणल्यानंतर त्यांना जबरदस्त मारहाण करत नग्न करुन गावात धिंड काढली. 
 
गावातून धिंड काढली जात असताना लोकांनी मोबाईल फोनवर त्यांचे व्हिडीओ काढले. धक्कादायक म्हणजे धिंड काढणा-यांमध्ये दोघांच्याही वडिलांचा सहभाग होता. 17 एप्रिलला मुलीचं जबरदस्ती दुस-या गावात लग्न लावून देण्यात आलं. यासाठी मुलीच्या कुटुंबाने 80 हजार रुपये मोजले. नवरामुलगा आणि त्याच्या कुटुंबियांनाही अटक करण्यात आली आहे.