Lok Sabha Elections 2019: 5 वर्षानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच घेणार पत्रकार परिषद?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 06:04 PM2019-04-24T18:04:25+5:302019-04-24T18:27:41+5:30

पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 एप्रिल रोजी वाराणसी येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.

Lok Sabha Elections 2019: PM Narendra Modi to address press conference on April 26 | Lok Sabha Elections 2019: 5 वर्षानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच घेणार पत्रकार परिषद?

Lok Sabha Elections 2019: 5 वर्षानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच घेणार पत्रकार परिषद?

Next

नवी दिल्ली - गेली अनेक दिवस विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केला जातो की, मोदी यांनी सत्तेच्या काळात एकदाही पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे गेले नाहीत. पंतप्रधान पत्रकार परिषद घेत नाहीत या आरोपाला उत्तर देण्यासाठी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेणार आहेत. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी पंतप्रधानांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीकडून दिली गेली आहे. मात्र अद्यापपर्यंत भाजपाकडून अशी कोणतीही पत्रकार परिषद होणार नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 

वाराणसी येथील हॉटेल ताज गंगा येथे दुपारी 12.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्रकार परिषद होणार आहे. उमेदवारी अर्ज भरुन झाल्यानंतर मोदी पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे जाणार आहेत. संपूर्ण पाच वर्षाच्या सत्ता काळात नरेंद्र मोदी यांनी कधीही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर आरोप होत होते. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला नरेंद्र मोदी घाबरतात अशी टीका विरोधकांकडून मोदींवर वारंवार केली जाते. त्यामुळे पहिल्यांदाच होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रकार परिषदेची उत्सुकता विरोधकांसोबत माध्यमातील पत्रकारांनाही लागून राहिली आहे. 

अनेकदा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत मी असा पंतप्रधान नव्हतो, जो पत्रकार परिषदेत बोलायला घाबरायचो. मी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी कायम संवाद साधत आलो आहे. मी परराष्ट्र दौऱ्यावरून परतल्यानंतर नेहमीच पत्रकार परिषद घेत होतो असं सांगितलं होतं. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून नेहमी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होणारे आरोपावर मोदी मौन का बाळगत आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला घाबरत असल्यानेच मोदी पत्रकार परिषद घेत नाही असा आरोप केला होता. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही देशाच्या इतिहासातील पत्रकार परिषद न घेणारा पहिला पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी अशी टीका केली होती. नरेंद्र मोदी यांच्याकडून माध्यमांना मुलाखती दिल्या जात होत्या मात्र संयुक्तरित्या पत्रकारांना कधीच नरेंद्र मोदी सामोरे गेले नव्हते. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 


 

Web Title: Lok Sabha Elections 2019: PM Narendra Modi to address press conference on April 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.