लालूंचा विश्वास सार्थ ठरविण्यात तेजस्वी अपयशी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 03:35 PM2019-05-22T15:35:21+5:302019-05-22T15:35:38+5:30

बिहारमध्ये भाजप, जदयू आणि लोजपा यांची युती मजबूत स्थितीत आहे. तर राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस-रालोसपा-हम-आरएलएसपी आणि व्हीआयपी यांची महाआघाडी पूर्णपणे अपयशी ठरण्याची शक्यता आहे.

Lok Sabha Election 2019 rjd leader tejashwi yadav | लालूंचा विश्वास सार्थ ठरविण्यात तेजस्वी अपयशी ?

लालूंचा विश्वास सार्थ ठरविण्यात तेजस्वी अपयशी ?

googlenewsNext

- राजा माने
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान रविवारी संपन्न झाले. त्यानंतर काही वेळातच वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल धडकले. या एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत एनडीएला बहुमत तर महाआघाडीला मोठा धक्का बसणार असल्याचे आकडे समोर आले आहेत. बिहारध्ये 'एनडीए'चे पारडे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे अनेक नेत्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार असून लालू प्रसाद यादव यांच्या भवितव्यावर देखील चर्चा रंगत आहे.

सर्वाधिक आश्चर्यचकीत करणारे एक्झिट पोल बिहारमधून आले आहेत. येथे भाजप, जदयू आणि लोजपा यांची युती मजबूत स्थितीत आहे. तर राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस-रालोसपा-हम-आरएलएसपी आणि व्हीआयपी यांची महाआघाडी पूर्णपणे अपयशी ठरण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलची आकडेवारी निकालात खरी ठरली तर भाजप आणि नितीश कुमार यांची दोस्ती आणखीनच घट्ट होणार आहे.

लालू प्रसाद यादव कारागृहात गेल्यानंतर महायुतीचे नेतृत्व तेजस्वी यादव करत आहेत. मात्र एक्झिट पोलमुळे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्व कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 'राजद'कडून पक्षाचे नेतृत्व तेजस्वी यांच्याकडे देण्यात आले आहे. तेजस्वी यादव प्रथमच लालू यांच्या गैरहजेरीत निवडणूक लढवत आहेत. त्यांना या निवडणुकीत पक्षात आणि कुटुंबात देखील मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले. मात्र याचा सामना करत तेजस्वी यांनी लालूंच्या पावलावर पाउल ठेवत सामाजिक न्यायाला आपला प्रमुख मुद्दा बनवलं.

तेजस्वी यांनी काँग्रेससह इतर पक्षांना सोबत घेत भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र तेजस्वी यांची मात्र भाजपच्या चक्रव्युहाला भेदताना दिसून येत नाही. ज्याप्रमाणे लालू यांनी विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या साथीत भाजपला दूर ठेवले होते, तसा चमत्कार तेजस्वी यांना करता येईल, अशी शक्यता कमीच आहे.

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार मोदी-नितीश-पासवान यांच्यासमोर तेजस्वीचे नेतृत्व कमकुवत दिसून आले. तसेच राहुल गांधी यांच्याशी केलेली मैत्री देखील तेजस्वी यांच्यासाठी फायदेशीर ठरताना दिसत नाही. महाआघाडीची बोलणी सुरू असतानाच लालूंच्या गैरहजेरीमुळे जागावाटपावरून बरीच ओढातान झाली. याचं नुकसान महाआघाडीलाच झाले असून तेजस्वी यांची सुरुवातच काहीशी वाईट झाली होती.

दरम्यान लालू यादव यांना षडयंत्र रचून कारागृहात टाकल्याचा मुद्दा तेजस्वी यांच्यासह राबडीदेवी आणि मीसा भारती यांनी जनतेसमोर मांडला. मात्र एक्झिट पोलवरून हा भावनात्मक मुद्दा देखील उपयोगी ठरला नसल्याचे चित्र आहे. काँग्रेस-राजदमधील अनेक दिग्गज नेते पराभवाच्या छायेत आहेत. तर महाआघाडीतील इतर पक्षांच्या विजयाची धुसर शक्यता आहे. परंतु, महाआघाडीतील प्रत्येक उमेदवाराचा विजय तेजस्वी यांच्या राजकीय कारकिर्दीचे भविष्य ठरवणारा आहे. पुढीलवर्षी लगेच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक तेजस्वी यांच्यासाठी लिटमस टेस्ट ठरणार आहे.

 

Web Title: Lok Sabha Election 2019 rjd leader tejashwi yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.