Lok Sabha Election 2019: BJP will win 300 seats on its own; says amit shah | 'फिर एक बार, स्वबळाचं सरकार'; अमित शहांनी सांगितला भाजपाचा 'आकडा'
'फिर एक बार, स्वबळाचं सरकार'; अमित शहांनी सांगितला भाजपाचा 'आकडा'

ठळक मुद्दे येत्या १९ तारखेला उर्वरित ५९ जागांवर मतदान होणार आहे. भाजपानं सहाव्या टप्प्यातच बहुमताचा आकडा पार केला असल्याचा दावा अमित शहा यांनी केला आहे. हा आकडा रालोआतील मित्रांचं टेन्शन वाढवणारा आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सहा टप्पे पूर्ण झालेत. ५४३ पैकी ४८४ मतदारसंघांमध्ये उमेदवारांचं भवितव्य यंत्रबद्ध झालं आहे. आता येत्या १९ तारखेला उर्वरित ५९ जागांवर मतदान होणार आहे. त्यात उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील प्रत्येकी १३, पश्चिम बंगालमधील ९, बिहारमधील ८, मध्य प्रदेशातील ८ जागांचा समावेश आहे. स्वाभाविकच, हा टप्पा सर्वच पक्षांसाठी 'लास्ट बट नॉट द लीस्ट' स्वरूपाचा आहे. परंतु, भाजपानं सहाव्या टप्प्यातच बहुमताचा आकडा पार केला असल्याचा दावा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. त्यांनी सांगितलेला आकडा रालोआतील मित्रांचं टेन्शन वाढवणारा आहे. 

'सातव्या टप्प्यानंतर भाजपा ३००चा आकडा ओलांडेल. सहाव्या टप्प्यातच आम्ही २७२ ची 'मॅजिक फिगर' गाठली आहे. त्यामुळे यावेळीही भाजपा स्वबळावर सरकार स्थापन करू शकेल', असं अमित शहा यांनी ठामपणे सांगितलं. देशभरात दौरे केल्यानंतर जे चित्र पाहिलं, त्या आधारे आपण हा अंदाज बांधत असल्याचं त्यांनी सांगितलं. ममता बॅनर्जी यांची 'दीदीगिरी' असलेल्या पश्चिम बंगालमध्येही ४२ पैकी २३ हून अधिक जागांवर 'कमळ' फुलेल, असंही त्यांनी सांगितलं. 


अमित शहा यांनी सांगितलेला आकडा विरोधकांपेक्षा त्यांच्या 'मित्रां'नाच धडकी भरवणारा आहे. २०१४च्या निवडणुकीत भाजपाने २८२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे त्यांना सरकारस्थापनेसाठी कुणाचीच मदत घ्यावी लागली नव्हती. त्यामुळे पाच वर्षं एनडीएतील अन्य पक्षांची कोंडीच झाली होती. राज्यसभेत संख्याबळ कमी असल्यानं ते मित्रांना धरून होते, पण एरवी सगळा आनंदच होता. यावेळी भाजपाच्या जागा कमी होतील आणि मोदी-शहांना मित्रांना सन्मान द्यावा लागेल, असं जाणकारांचं गणित आहे. त्यामुळे मित्रपक्षांनाही थोडा दिलासा मिळाला होता. परंतु, अमित शहांनी त्यांना पुन्हा काळजीत टाकलंय. 


दीदी, स्वतःला देव समजू नका!

दरम्यान, अमित शहा यांच्या पश्चिम बंगालमधील रोड शोला हिंसक वळण लागलं होतं. दगडफेक, जाळपोळीचे प्रकार घडले होते. हा हिंसाचार ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसनेच घडवल्याचा आरोप अमित शहा यांनी केला. 'आम्ही देशभरात निवडणूक लढवली. पण कुठेच हिंसाचार झाला नाही. कारण तिथे तृणमूल काँगेस नाही. फक्त पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला, तो केवळ तृणमूल सत्तेत असल्यानेच, असं शरसंधान शहांनी केलं. दीदी, तुम्ही स्वतःला देव समजू नका. तुमचं शासन जनताच संपवेल, असंही त्यांनी सुनावलं. भर भाषणात बदला घेण्याची धमकी देणाऱ्या ममतादीदींवर निवडणूक आयोगाने कुठलीही कारवाई केलेली नाही, हा दुटप्पीपणा असल्याचा आरोपही शहांनी केला.  


Web Title: Lok Sabha Election 2019: BJP will win 300 seats on its own; says amit shah
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.