Lok Sabha 2019 Exit Poll:  उत्तर प्रदेशात काय होणार? अनेकांचे गणित चुकणार  

By बाळकृष्ण परब | Published: May 20, 2019 09:56 AM2019-05-20T09:56:07+5:302019-05-20T09:57:57+5:30

लोकसभेतील जागांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशबाबत मात्र विविध एक्झिट पोलमधून परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील आकडेवारीबाबत संभ्रम वाढला आहे...

Lok Sabha 2019 Exit Poll: What will happen in Uttar Pradesh? | Lok Sabha 2019 Exit Poll:  उत्तर प्रदेशात काय होणार? अनेकांचे गणित चुकणार  

Lok Sabha 2019 Exit Poll:  उत्तर प्रदेशात काय होणार? अनेकांचे गणित चुकणार  

Next

लोकसभा निवडणुकीसाठीचे सातव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केलेल्या एक्झिट पोलमधून  केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचे पुनरागमन होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. लोकसभेतील जागांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशबाबत मात्र विविध एक्झिट पोलमधून परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील आकडेवारीबाबत संभ्रम वाढला असून, या राज्यात अनेकांचे अंदाज चुकण्याची शक्यता आहे. 

दिल्लीच्या सत्तेचा महामार्ग उत्तर प्रदेशमधून जातो, असे राजकीय जाणकार म्हणतात. 2014 मध्ये या राज्याने भाजपाच्या दिशेने दिलेला कौल पाहता यात किती तथ्य आहे याची खात्री पटते. त्यामुळेच उत्तर प्रदेशात गेल्यावेळच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपाने कंबर कसली होती. तर भाजपा आणि मोदींना रोखण्यासाठी उत्तर प्रदेशातील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले सपा आणि बसपा जुने वादविवाद विसरून एकत्र आले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशातील लढाई अटीतटीची होणार याचे संकेत गेल्या काही महिन्यांपासून मिळत होते. त्यात या राज्यात नाममात्र उरलेला  काँग्रेस पक्ष कुणाचे गणित बिघडवणार याचीही चर्चा होती.


मात्र रविवारी प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशबाबत परस्परविरोधी दावे करण्यात आल्याने येथील निकालांबाबतचा संभ्रम वाढला आहे. एकीकडे इंडिया टुडे-माय अॅक्सिस, टुडेज् चाणक्यसारख्या संस्थांनी उत्तर प्रदेशात भाजपाला बंपर यश मिळेल असे भाकीत केले आहे. तर एबीपी-नेल्सन आणि सी-वोटरसारख्या सर्वेक्षण संस्थानी उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि मायावतींच्या नेतृत्वाखालील महाआघाडीच आघाडीवर राहील असा अंदाज वर्तवला आहे. 

विविध संस्थांच्या एक्झिट पोलवर नजर टाकल्यास टाइम्स  नाऊ व्हीएमआरने भाजपाला 58, महाआघाडीला 20 तर काँग्रेसला 2 जागा दिल्या आहेत. तर इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाने भाजपाला 62 ते 68, महाआघाडीला 10 ते 16 आणि काँग्रेसला 2 जागा दिल्या आहेत. त्याशिवाय न्यूज 24-टुडेज चाणक्यनेही आपल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला 65 तर महागठबंधनला 13 आणि काँग्रेसला दोन जागा दिल्या आहेत. रिपब्लिक-जन की बात ने भाजपाला 46 ते 57 तर महाआघाडीला 15 ते 29 जागा आणि काँग्रेसला 2 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. 

तर एबीपी-नेल्सनने आपल्या एक्झिट पोलचा कौल महाआघाडीच्या पारड्यात टाकला आहे. एबीपी-नेल्सनच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला 33 तर महाआघाडील 45 जागा आणि काँग्रेसला केवळ 2 जागा मिळतील. सी-वोटरनेही उत्तर प्रदेशात महाआघाडीचे पारडे जड दाखवले आहे.  सी-वोटरच्या पोलनुसार भाजपाला 38 तर महाआघाडीला 40 जागा मिळण्याची शक्यता आहे. 

 विविध संस्थांच्या या परस्परविरोधी कौलामुळे उत्तर प्रदेशमधील निवडणुकीचा अंदाज गुंतागुंतीचा बनला आहे. तसेच भाजपासह सर्वच राजकीय पक्षांची धाकधुक वाढली आहे. मात्र निवडणुकीदरम्यानचे वातावरण, उत्तर प्रदेशातील जातीय आणि धार्मिक गणित पाहता उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणि महागठबंधनमध्ये अटीतटीची लढाई आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निकालांवेळी दोन्ही पक्षांमध्ये तशीच लढाई दिसण्याची शक्यता आहे. पण उत्तर प्रदेशमधील जागांचा अंदाज वर्तवताना विविध संस्थांचा उडालेला गोंधळ पाहता प्रत्यक्ष निकालांनंतर अनेकांचे गणित चुकण्याचीच शक्यता अधिक आहे. आता उत्तर प्रदेशातील मतदारांनी नेमका काय कौल दिला आहे, हे पाहण्यासाठी 23 मेपर्यंत वाट पाहणेच रास्त ठरणार आहे. 

Web Title: Lok Sabha 2019 Exit Poll: What will happen in Uttar Pradesh?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.