ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते बुलेट ट्रेनचं भूमिपूजन1 लाख कोटी रुपयांचा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पबुलेट ट्रेन प्रकल्पावर शिवसेनेचं टीकास्त्र

अहमदाबाद, दि. 14 - मुंबई-अहमदाबाद या बहुचर्चित बुलेट ट्रेन मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.  साबरमतीमध्ये या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी भूमिपूजन केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित आहेत.  ५०८ किमीचा मार्ग असलेला हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी ७०० हेक्टरहून अधिक जमीन संपादित करण्यात येणार असून, ठाणे-वाशी भागातून ७ किमी समुद्राखालून ही रेल्वे धावणार आहे. याशिवाय ही रेल्वे मुंबईतून १५ किमी भूमिगत मार्गाने जाणार आहे. याशिवाय ही रेल्वे मुंबईतून १५ किमी भूमिगत मार्गाने जाणार आहे. 1.08 लाख कोटी रुपये खर्च असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जपाननं 88 हजार कोटीचं कर्ज दिलं आहे. हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. एचएसआरसीचे अधिकारी हा प्रस्तावित मार्ग असल्याचे सांगत असले, तरी याला मंजुरी मिळणे ही औपचारिकता आहे. या मार्गाचे हवाई आणि भूभौतिक सर्वेक्षण झाले आहे. त्यानंतर, वाशी ते ठाणे हा मार्ग पाण्याखालून करण्यात यावा, असा निर्णय झाला.

LIVE UPDATES - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी केले भूमिपूजन. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी भाषणाची सुरुवात नमस्कार असं म्हणून केली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे

- भारतात जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे मनापासून स्वागत 
- गती, प्रगती, तंत्रज्ञान आणि विकास हे बुलेट ट्रेनचं वैशिष्ट्य ठरेल
- बदलाच्या दिशेने आज भारताने मोठं पाऊल टाकलं आहे
- बदल होणं खूपचं गरजेचं आहे
- बुलेट ट्रेनमध्ये सुविधा आणि सुरक्षाही आहे,शिवाय यामुळे रोजगारदेखील उपलब्ध होणार आहेत 
- भारत आणि जपानमधील नात्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि भावनात्मक आहे
- आज या प्रकल्पाचं कमी कालावधीत भूमिपूजन होते आहे तर याचे संपूर्ण श्रेय शिंजो आबे यांचे आहे

- हायस्पीड कनेक्टिव्हिटीमुळे मोठी आर्थिक प्रगती
- बुलेट ट्रेनमुळे मोठ्या प्रमाणात इंधन बचत होण्यास मदत
- मुंबई-अहमदाबाद शहरातील अंतर कमी होईल

- बुलेट ट्रेनमुळे केवळ मुंबई-अहमदाबादमधील अंतरच कमी नाही होणार दोन्ही शहरांतील लोकंदेखील जवळ येतील   
- बुलेट ट्रेनमुळे देशाला एक नवीन गती मिळेल 
- या प्रकल्पामुळे रेल्वेला फायदा होणार आहे 
- बुलेट ट्रेनमुळे प्रकल्पामुळे मेक इन इंडिया योजना अधिक मजबूत होईल 

 

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या भाषणातील मुद्दे
- बुलेट ट्रेनमुळे भारत-जपानचे संबंध अधिक दृढ
- जपानमधील बुलेट ट्रेन सेवा अत्यंत सुरक्षित 
- जपानमध्ये एकही ट्रेन दुर्घटना नाही 
- जपानमधून 100 इंजिनिअर भारतात दाखल
- जपानच्या पंतप्रधानांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक 
- पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्टी असलेले नेते  

- जपानचा ''ज'' आणि इंडियाचा ''इ'' एकत्र केल्यास 'जय' शब्द निर्माण होतो, असे सांगत आबे यांनी 'जय जपान, जय इंडिया'चा नारा दिला
- पुढच्या वेळी मी बुलेट ट्रेनमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भारतात येईन
- मला गुजरात खूप आवडतं
- शिंजो आबे यांनी आपल्या भाषणाचा शेवट 'धन्यवाद' नं केली


आजचा दिवस देशासाठी खूप ऐतिहासिक असा आहे -  देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

आजपासून आधुनिक भारताचा पाया रचला जात आहे -  देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

या प्रकल्पामुळे मेक इन इंडिया योजनेला मजबूती मिळेल आणि लोकांसाठी रोजगार उपलब्ध होतील - पीयूष गोयल, रेल्वे मंत्री
ही बुलेट ट्रेन जपान आणि भारतातील लोकांमधील बंधुत्वाचे प्रतीक आहे -  पीयूष गोयल, रेल्वे मंत्री


पंतप्रधान नरेंद्र मोदी व  शिंजो आबेंनी केला रोड शो

दरम्यान, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे व त्यांच्या पत्नी अकी यांचे बुधवारी अहमदाबाद विमानतळावर आगमन झाले. पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वागत केले. तर प्रोटोकॉल मोडून मोदींनी शिंजो आबेंसोबत अहमदाबाद ते साबरमती असा रोड शोदेखील केला. यावेळी शिंजो आबे व त्यांच्या पत्नी दोघांनीही भारतीय वेश परिधान केला होता. साबरमती आश्रमात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला फुले अर्पण केली आणि नरेंद्र मोदी यांच्यासमवेत शहरातील 16 व्या शतकातील मशिदीलाही भेट दिली.  

उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

तर दुसरीकडे, या प्रकल्पावरुन शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. ''बुलेट ट्रेन प्रकल्पाने रोजगारनिर्मिती होईल असे सांगणारे थापाच मारत आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि काम सुरू असताना जपानची कंपनी खिळ्यापासून रुळापर्यंत, खडीपासून सिमेंटपर्यंत सर्व तंत्रज्ञान त्यांच्या देशातून आणणार आहे. भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यास जपानी कंपनीने विरोध केला आहे. त्यामुळे जमीन  आणि पैसा महाराष्ट्राचा व गुजरातचा; लाभ मात्र जपानचा'', अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केले आहे. शिवाय, मुंबईची लूट बुलेट ट्रेनने होऊ नये हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना, असेही ते म्हणालेत.  पुढे ते असेही म्हणालेत की, ''बुलेट ट्रेनची मागणी तर कुणीच केली नाही, पण कोणतीही मागणी नसताना एका रेल्वे रुळावर ३० हजार कोटी उधळणे यास काय म्हणायचे? पुन्हा येथेही अनेकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उभा ठाकणारच आहे. मोदींचे हे स्वप्न सामान्य माणसांचे नाही. ते श्रीमंतांचे व व्यापारी वर्गाच्या कल्याणाचे आहे व त्यासाठी खास पीयूष गोयल यांना रेल्वेमंत्री केले''.
कसा असणार आहे आजचा कार्यक्रम?
सकाळी 9.50 वाजता - भारतातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद-मुंबईचं भूमीपूजन

सकाळी 11.30 वाजता – दांडी कुटीरला भेट

दुपारी 12 वाजता – उच्चस्तरीय चर्चा

दुपारी 1  वाजता – दोन्ही देशांत करार आणि पत्रकार परिषद 

दुपारी 2.30  वाजता – भारत-जपान बिझनेस लीडर ग्रुप फोटो

दुपारी 3.45  वाजता  – महात्मा मंदिरातील कॉन्व्हेंन्शन हॉलमधील प्रदर्शनाला भेट

रात्री 9.35  वाजता  – शिंजो आबे टोकियोला रवाना होणार