लखनऊ - आपल्याच मुलीची हत्या करणा-या दांपत्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील न्यायालयाने पीडित मुलीचे वडिल आणि सावत्र आई यांच्यावरील आरोप सिद्द झाल्यानंतर हा निर्णय सुनावला आहे. याशिवाय दोघांनाही प्रत्येकी 10-10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दोषी दांपत्य हत्या झाली तेव्हापासूनच कारागृहात आहेत. 

जिल्हा शासकीय वकील मनोज यादव यांनी सांगितलं की, न्यायाधीश भुपेंद्र सहाय यांनी मंगळवारी रामऔतार निषाद आणि त्यांची दुसरी पत्नी सुधा निवासी यांना आपली मुलगी संगीताच्या हत्येच्या आरोपाखाली दोषी मानलं. सुधा निवासी ही संगीताची सावत्र आई होती. दोषी सिद्द झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, आणि प्रत्येकी 10-10 हजाराचा दंड ठोठावला. 

पीडित संगीताचे आजोबा रामखेलावन निवासी नांदादेव यांनी 21 सप्टेंबर 2013 रोजी जसपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावेळी त्यांनी आपला जावई आणि त्याच्या दुस-या पत्नीविरोधात तक्रार करत हत्येचा आरोप केला होता. आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर जावई रामऔतार निषाद याने दुसरं लग्न केलं होतं अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती. पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगी दोन मुलं होती. 

घटनेच्या रात्री रामऔतार निषादने दुसरी पत्नी सुधासोबत मिळून आपली नात संगीताला मारहाण करुन मारुन टाकलं असा आरोप  रामखेलावन निवासी नांदादेव यांनी केला होता. या घटनेचे साक्षीदार असणा-या दोघा अल्पवयीन भावांनी न्यायालयात साक्ष दिली होती. त्याच्या साक्षीच्या आधारेच न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर पीडित तरुणीच्या आजोबांनी तिच्या आत्म्याला आता शांती मिळेल अशी प्रतिक्रिया दिली.